महामारी सुरू असताना बोगस डॉक्टर्स जोरात; पण तक्रारीच येत नाहीत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:26 AM2021-06-29T04:26:23+5:302021-06-29T04:26:23+5:30
सातारा : काही जण डॉक्टर असल्याचा आव आणून रुग्णांवर उपचार करतात. अशा बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाच्या वतीने कारवाई करण्यात ...
सातारा : काही जण डॉक्टर असल्याचा आव आणून रुग्णांवर उपचार करतात. अशा बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येते. कोरोना महामारीच्या काळात तक्रारीनंतर जिल्ह्यात पाच जणांची चौकशी करण्यात आली. त्यातील एकावरच कारवाई झाली. बोगस डॉक्टर्सबद्दल तक्रारीच नसल्याने कारवाया कमी होत असल्याचे वास्तव आहे.
वैद्यकीय कोणतीही पदवी नसतानाही व्यवसाय करणारे अनेकजण असतात. वैद्यकीय ज्ञान नसल्यामुळे रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होतो. काही वेळेला तर चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा मृत्यूही होतो. अशा बोगस डॉक्टरांकडून अनेक वेळेला असे प्रकार घडतात. अशा बोगस डॉक्टरवर आरोग्य विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येते.
कोरोना महामारीच्या या काळात वैद्यकीय ज्ञान नसणारे अनेक जण कोरोना बरे करतो असे म्हणत असतात. तसेच दुर्गम व ग्रामीण भागात तर निरक्षर लोकांचा फायदा घेत काही जण वैद्यकीय व्यवसाय सुरू करतात. यामधून लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत आर्थिक लूट करणे हाच उद्देश असतो. ज्या वेळी अशा बोगस डॉक्टरचे बिंग फुटते, तेव्हा कारवाईला सामोरे जावे लागते. नाहीतर आपला गाशा गुंडाळावा लागतो. मात्र, हे डॉक्टर सहजासहजी जात नाहीत. काही दिवसांनी पुन्हा ते दुसऱ्या कोणत्या तरी गावात जाऊन रुग्णांवर उपचार करतात. रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. तरच बोगसपणाला आळा बसण्यास मदत होईल.
चौकट :
तक्रारीनंतर समितीकडून चौकशी...
कोणी वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार करत असतील तर त्याविषयी तक्रार येणे महत्त्वाचे असते. त्यानंतर तालुकास्तरावर एक समिती असते. या समितीत गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागाच्या विस्तार अधिकाऱ्याचा समावेश असतो. ही समिती संबंधित डॉक्टरबद्दल चौकशी करते.
...............................................
जिल्ह्यात एकूण बोगस डॉक्टर्सवर कारवाई - १
विनापरवाना सुरू असलेल्या रुग्णालयावर कारवाई
- ००
............................................................
खटाव तालुक्यातील एकावर कारवाई...
कोरोना विषाणूच्या काळात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे डॉक्टरांबाबत एकूण पाच तक्रारी आल्या. या तक्रारी एप्रिल २०२० पासून मार्च २१ पर्यंतच्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने पाचही जणांकडे चौकशी करण्यात आली. त्यामधील एका बोगस डॉक्टरवर कारवाई झाली. कारवाई झालेला बोगस डॉक्टर हा खटाव तालुक्यातील होता. त्यामुळे वर्षभरात बोगस दिसून आलेल्या एकाच डॉक्टरवर कारवाई झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
............................................................
सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ...
वैद्यकीय ज्ञान नसणारे पण डॉक्टरची पाटी लावणारे बोगस डॉक्टर हे ग्रामीण व दुर्गम भागातच दवाखाना थाटतात. भोळ्या, अज्ञानी व निरक्षर लोकांचा फायदा घेतात. थोड्या औषधांवर रुग्णांवर उपचार करण्यात येतात. पण, वैद्यकीय ज्ञान नसल्याने रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू होतो. काही वेळा रुग्णाचा मृत्यू होतो. तर अनेक वेळा उपचार करूनही गुण न आल्यास नातेवाइकांना रुग्णाला मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात येते.
..............................................................................