बोलेमामांचा वडापाव आजपासून पुन्हा सातारकरांच्या सेवेत
By admin | Published: October 1, 2014 01:10 AM2014-10-01T01:10:09+5:302014-10-01T01:10:49+5:30
सातारा : राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे बोलेमामांच्या कन्या बुधवारी नव्या उमेदीने
सातारा : राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे बोलेमामांच्या कन्या बुधवारी नव्या उमेदीने नव्या आव्हानांना सामोऱ्या जात आहेत. ‘लोकमत’च्या आवाहनाला सातारकरांनी भरघोस प्रतिसाद दिल्यानंतर मामांचा वडापावचा गाडा पूर्वीच्याच ठिकाणी सुरू होत आहे.
अनंत चतुर्दशीच्या रात्री राजपथावरील इमारतीची भिंत कोसळून चंद्रकांत बोले यांचा मृत्यू झाला होता. ‘बोलेमामांचा वडापाव’ हे सातारकरांच्या जिभेवर कोरलेले नाव कायम राखण्याचा निर्धार त्यांच्या कन्यांनी बोलून दाखविल्यानंतर ‘लोकमत’ने सातारकरांना मदतीचे आवाहन केले होते.
दुसऱ्याच दिवसापासून विविध संस्था, मंडळे, कार्यालयांतील कर्मचारी, विद्यार्थी आणि व्यक्तिगतरीत्याही बोले कुटुंबीयांकडे आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला. बघता-बघता सुमारे दोन लाख रुपयांचा निधी उभा राहिला आणि बोलेमामांच्या कन्यांनी बुधवारपासून (दि. १ आॅक्टोबर) वडापावची गाडी सुरू करण्याचा निर्णय घेऊन तयारी केली.
‘निवृत्तिनाथ कट्टा’ या सेवानिवृत्त व्यक्तींच्या ग्रुपने मंगळवारी आर्थिक मदत दिली. ग्रुपमधील व्ही. के. कुलकर्णी, माधवराव गोडबोले, नानासाहेब द्रवीड, पापाभाई तडसरकर, गनीभाई शेख, सुरेश महाजनी, मुकुंदराव कोल्हटकर, ज्ञानेश्वर निकम, मनोहर जालीहाल, रमेश वेलणकर, डॉ. अरुण कुलकर्णी, रामभाऊ जाधव, रमेश ठोंबरे, जे. एस. शिर्के, एस. बी. मुजूमदार, शशिकांत पिंपळखरे, चंद्रकांत भस्मे, सुरेंद्र सबनीस, शरद डिके, विश्वास दांडेकर, बाबासाहेब दबडे, बी. जी. जोशी, उदय जोशी, बाळासाहेब चवरे, के. व्ही. लिमये, अरुण रायरीकर, अजित शहाणे, राजाभाऊ दामले, ए. के. गर्गे, व्ही. जी. ग्रामोपाध्ये आणि पुरुषोत्तम शेठ यांनी बोले कुटुंबीयांसाठी मदत जमा केली. दरम्यान, सुहास राजेशिर्के यांनीही बोले कुटुंबीयांना मदत केली. (प्रतिनिधी)