श्वानासह बॉम्बशोधक पथक तांबवेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:40 AM2021-05-19T04:40:57+5:302021-05-19T04:40:57+5:30
दरम्यान, घटनेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी बॉम्बशोधक व नाशक पथक श्वानासह घटनास्थळी दाखल झाले होते. ज्या ठिकाणी बॉम्ब फोडून निष्क्रिय ...
दरम्यान, घटनेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी बॉम्बशोधक व नाशक पथक श्वानासह घटनास्थळी दाखल झाले होते. ज्या ठिकाणी बॉम्ब फोडून निष्क्रिय करण्यात आले. त्या परिसरात श्वानाद्वारे स्फोटकाच्या अवशेषांचा शोध घेण्यात आला, तसेच ती खड्ड्यामध्ये सुरक्षितरीत्या मुजविण्यात आली. पुण्याच्या दहशतवादविरोधी पथकानेही घटनास्थळी भेट देऊन स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
तांबवे येथे कोयना नदीपात्रात सोमवारी दुपारी तीन जिवंत हातबॉम्ब आढळून आले होते. साकुर्डीतील संभाजी चव्हाण, अरुण जाधव व योगेश मदने हे तीन युवक त्या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी गेले असताना, एका पिशवीत त्यांना तीन हातबॉम्ब सापडले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांसह दहशतवादविरोधी पथक, तसेच बॉम्बशोधक व नाशक पथक त्या ठिकाणी दाखल झाले. या पथकाने तिन्ही बॉम्बची तपासणी केली असता ते जिवंत असल्याचे निदर्शनास आले, तसेच ते आयुध कारखान्यात बनविण्यात आले असून, केवळ सैन्य दलालाच या बॉम्बचा पुरवठा होतो, असेही तपासातून समोर आले. बॉम्बवर आढळलेले क्रमांक नोंदवून बॉम्बनाशक पथकाने रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ते बॉम्ब एका मोठ्या खड्ड्यात पुरून फोडले. यावेळी मोठा आवाज होऊन परिसर अक्षरश: हादरला. मंगळवारी सकाळी बॉम्बशोधक व नाशक पथक श्वानासह पुन्हा त्या ठिकाणी गेले. खड्ड्यात फोडलेल्या बॉम्बचे अवशेष परिसरातून एकत्रित करून ते पुन्हा सुरक्षितरीत्या खड्ड्यात गाडण्यात आले. अवशेष शोधण्यासाठी श्वानाचीही मदत घेण्यात आली.
हयगयीचे कृत्य करून नदीपात्रात जिवंत बॉम्ब टाकून लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी कऱ्हाड ग्रामीण पोलिसात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मासेमारी करणारा युवक संभाजी महादेव चव्हाण याने याबाबतची फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे तपास करीत आहेत.
- चौकट
हा ‘प्रिन्स टेलर’ कोण..?
बॉम्ब ज्या पिशवीत आढळून आले, त्या पिशवीचीही पोलिसांनी तपासणी केली आहे. पांढऱ्या रंगाच्या फाटलेल्या त्या प्लास्टीक पिशवीवर ‘प्रिन्स टेलर’ असे मोठ्या अक्षरात लिहिले असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे, तसेच त्या टेलरच्या दुकानाचा पत्ताही पिशवीवर असून, तो पत्ता पोलिसांच्या तपासात फायदेशीर ठरणार का, हे महत्त्वाचे आहे.
फोटो : १८केआरडी०२
कॅप्शन : तांबवे, ता.कऱ्हाड येथे मंगळवारी सकाळी बॉम्बशोधक व नाशक पथकाने बॉम्बचे अवशेष खड्ड्यात मुजविले. (छाया : दीपक पवार)