माणमध्ये बंधारे, जलयुक्तची किमया..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 10:45 PM2016-08-24T22:45:03+5:302016-08-24T23:44:59+5:30
पाणीपातळीत वाढ : पीक पद्धतही बदलणार; पाणीटंचाई कमी होण्यास मदत
दहिवडी : जिहे-कटापूर, उरमोडी पाणी योजना पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत माण तालुक्याचा पाणी प्रश्न संपणार नाही, अशी अटकळ बांधली जात असतानाच तालुक्यात सिमेंट साखळी बंधारे, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कोरडवाहू शाश्वत शेती अभियान व जलयुक्त शिवार अभियानातून ३८४ सिमेंट बंधारे सुमारे ३०० हेक्टर क्षेत्रांवर समतोल चर गाळ काढणी, बंधारे दुरुस्ती अशी अनेक कामे झाली. त्यामुळे तालुक्यात झालेल्या पावसाचा थेंब ना थेंब जिरला असून, पाणी पातळीमध्ये १.५ ते ३ मीटरने वाढ झाली आहे. आता पीक पध्दतीतही बदल होणार आहे.
माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून तालुक्यातील ५१ गावांत पाणलोट विकास कार्यक्रम राबविला गेला. त्यानंतर बनगरवाडी, सोकासन, कासारवाडी, भालवडी या ठिकाणी शाश्वत कामे झाली. तालुक्यातील पहिल्या टप्प्यात २४ गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला. त्यामध्ये १२२१ कामे पूर्ण झाली. तत्कालीन कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी आणला. त्यामुळे लोकसहभागातून अनेक गावांनी चित्र पालटवले. लोधवडे, दानवलेवाडी, बिदाल अशी सुरुवातीला मोजकी गावे होती. आता गोंदवले, वरकुटे-मलवडी, पांढरवाडी, दिवडी, कोळेवाडी या गावांनी विशेषत: जलसंधारणावर भर दिला.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी माण तालुक्यात अनेक गावांना भेट देऊन लोकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे पांढरवाडी सारख्या गावात ७ साखळी बंधारे झाले. १ पाणलोट मधून तर ३ लोकसहभागातून बंधारे झाले. २२५ टीसीएम पाणी आणले गेले. पांढरवाडीत प्यायला पाणी नाही तेथे आज पाणी पातळी वाढल्याचे दिसते. दुर्गमभागात पाणी वाढल्याने आज १५ ते ३ मीटरने पातळी वाढली आहे. त्यामुळे ३०० फुटांवर न लागणारे पाणी आज ५० फुटांवर लागत आहे.
पांढरवाडी, महिमानगड परिसरात वाटाणा पीक ७०० ते ८०० हेक्टर, मूग २ ते २५०० हेक्टर, मका या पिकात वाढ झाली आहे. पूर्वी वर्षातून एक पीक घेतले जात होते. त्यामध्ये आता बदल होणार आहे. (प्रतिनिधी)
गेल्या तीन वर्षांमध्ये पाणलोट व्यवस्थापन कोरडवाहू शाश्वत शेती अभियान, साखळी सिमेंट बंधारे व जलयुक्तमधून प्रचंड कामे झाल्याने पाण्याची पातळी १.५ ते ३ मीटरने वाढली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
- राजेश जानकर,
तालुका कृषी अधिकारी
शासनाचे पाठबळ व लोकसहभाग. त्याचबरोबर अभिनेते सयाजी शिंदे यांचे प्रोत्साहन यामुळे गावचा कायापालट झाला. आज पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, आटलेल्या बोअरवेलमधून पुन्हा पाण्याचे स्त्रोत वाढले आहेत.
- सुभाष घाडगे महाराज,
पांढरवाडी