ग्रंथमहोत्सवाने परराज्यातील मुलांना लावली मराठीची गोडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:11 AM2021-02-21T05:11:11+5:302021-02-21T05:11:11+5:30
साताऱ्यात मोठी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीसह परिसरात उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतील कुटुंबे उदरनिर्वाहासाठी दाखल होत असतात. परराज्यातून ...
साताऱ्यात मोठी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीसह परिसरात उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतील कुटुंबे उदरनिर्वाहासाठी दाखल होत असतात. परराज्यातून सातारा शहरात आल्यानंतर हातावर पोट असलेले हे लोक मुलांना मराठी शाळेतच दाखल करतात. ग्रंथमहोत्सव समितीचे कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी गेल्या वर्षी या अमराठी लोकांना मराठी शिकविण्याचा संकल्प सोडला होता. त्यांच्या पत्नी शीलादेवी यांनीही त्यांच्या संकल्पाला आकार देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच चिटणीस संस्थापक असणाऱ्या लोकमंगल हायस्कूलमधील शिक्षकांनीदेखील हा विषय उचलून धरला.
वास्तविक, या सर्वांनीच ज्ञानदानाची ही नवी संधी म्हणून अमराठी मुलांना चांगल्या पद्धतीने मराठी शिकविण्याचा प्रयत्न केला. गेले वर्षभर शाळा बंद होती, तरीदेखील वेगवेगळ्या माध्यमातून या मुलांना मराठी शिकविण्यात आले. विशेष म्हणजे बाहेरील राज्यांतून आलेली ही मुले चांगल्या पद्धतीने मराठी बोलू लागली. तसेच त्यांनी आपल्या आई-वडिलांनाही मराठी शिकवायला सुरुवात केली. सैदापूर भागातील गोसावी समाजातील मुलांनाही शुद्ध मराठी भाषा यावी, या हेतूने शीलादेवी चिटणीस यांनी स्वत: तेथे जाऊन त्यांना मराठी शिकवले.
कोरोनाची महामारी कमी व्हावी, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर परराज्यातून कामानिमित्त येणाऱ्या अल्पशिक्षित लोकांसाठी प्रौढ साक्षरता वर्ग सुरू करून त्यांना आम्ही मराठी शिकवणार आहोत.
- शिरीष चिटणीस, कार्यवाह, सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समिती
लोकमंगल हायस्कूल एमआयडीसी या विद्यालयात मी शिकत आहे. या ठिकाणी नेहमी थोर कवी, साहित्यिक यांची भाषणे असतात. शिरीष चिटणीस यांनी गेल्या दोन वर्षांपासून शाळेत मी वाचलेले पुस्तक हा उपक्रम आयोजित केला, त्यामुळे मी भाषण करू लागलो आहे.
- हिमांशू शर्मा, उत्तर प्रदेश
अंगणवाडी शिक्षिका तसेच मित्रांनी मला मराठी भाषा बोलायला शिकवले. आमच्या शेजारील दीदीने मला मराठी शिकवले. लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या शाळेत मी शिकतो. मी आता चांगल्या पद्धतीने मराठी बोलू व लिहू लागलो आहे. माझ्या आई व बाबांना मी मराठी शिकवले. त्यामुळे ते आता मराठी बोलू लागले आहेत. आम्ही गावी गेल्यानंतर आमच्याकडे तेथे लोक आदराने बघतात.
- करण शर्मा, उत्तर प्रदेश
सागर गुजर
फोटो आहे