खानदानी राजकारणाला बूस्टर डोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 11:39 PM2017-11-09T23:39:47+5:302017-11-09T23:41:18+5:30

Booster Dose for Family Politics | खानदानी राजकारणाला बूस्टर डोस !

खानदानी राजकारणाला बूस्टर डोस !

googlenewsNext



सागर गुजर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात नेहमीच नेत्यांच्या पुढच्या पिढ्यांना संधी दिली गेली आहे. कार्यकर्त्यांचे संघटन करण्याची कुवत आणि धडाडी असलेली अशी अनेक मंडळी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातही झळकली आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव तेजस शिंदे यांच्या रुपाने जिल्ह्यात खानदानी राजकारणाला बूस्टर डोस मिळाल्याचे पुढे येते. आता युवकांचे संघटन राष्ट्रवादीच्या पाठिशी ठेवण्याचे मोठे दिव्य तेजस यांना पार पाडावे लागणार आहे.
राष्ट्रवादी काँगे्रस युवक जिल्हाध्यक्षपदासाठी आमदार शशिकांत शिंदेंचे पुत्र तेजस शिंदे यांचे नाव अंतिम झाले आहे. खुद्द अजित पवार यांनीच त्यांच्या नावाची शिफारस केल्याने तेजस यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली. गुरुवारी राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, बाळासाहेब सोळस्कर, किरण साबळे-पाटील, सतीश चव्हाण, राजकुमार पाटील, राजेंद्र लावंगारे, समिंद्रा जाधव, विजयकुमार कुंभार व इतर पदाधिकाºयांच्या उपस्थित तेजस शिंदे यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी राष्ट्रवादी भवनात झाली होती.
आमदार शिंदे यांचे सुपुत्र तेजस यांना युवकचे जिल्हाध्यक्ष करून त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणात लाँचिंग करण्याचा ध्यास घेतला होता. त्यानुसार आमदार शिंदे यांच्याशी काहींनी चर्चा करून त्यांची संमती घेतली होती. त्यानंतर ही बाब माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घालण्यात आली. आगामी काळात राजकीय समीकरणे ओळखून तेजस शिंदे यांचीच निवड केली. त्यानुसार युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी तेजस शिंदे यांचे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी निश्चित केले.
आमदार शशिकांत शिंदे यांचे राष्ट्रवादी पक्षाच्या यशात मोठे योगदान आहे. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्याप्रमाणेच आमदार शिंदे यांच्या शब्दाला या पक्षात मोठे वजन आहे. तेजस हे त्यांचे पुत्र आहेत; परंतु जिल्ह्याच्या राजकारणात संधी देत असताना कार्यकर्त्यांची इच्छा आणि त्यांचे मत याला आमदार शिंदे यांनी महत्त्व दिले. कार्यकर्त्यांचा रेटा पाहून त्यांनीही पुत्राच्या नावाला अनुमती दिली.
जिल्ह्याच्या राजकारणाच्या इतिहासावर नजर मारली असता कºहाडच्या माजी खासदार दिवंगत प्रमिलाकाकी चव्हाण यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राजकारणात संधी मिळाली. काँगे्रस पक्षाच्या माध्यमातून केंद्रात मंत्रीपदासह राज्याचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्यानंतर त्यांचे नातू आमदार शंभूराज देसाई यांना राजकारणात संधी मिळाली. अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे अध्यक्षपद त्यांनी पेलले. जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून ते निवडून आले आहेत. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्यानंतर त्यांची पुढची पिढी तितक्याच ताकदीने राजकारणात स्थिरावली आहे. आमदार मकरंद पाटील यांचे राष्ट्रवादी पक्षात मोठे वजन आहे. खासदार शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासास ते पात्र ठरले आहेत. भविष्यात त्यांच्याकडे मोठी संधी येण्याची शक्यता आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी त्यांचे चिरंजीव सत्यजितसिंह पाटणकर यांना राजकारणात संधी दिली. पाटण तालुक्यातील पाटणकर गटाचे नेतृत्व सध्या सत्यजितसिंह करतात. विधानसभेवर जाण्याची संधी मात्र अद्याप त्यांना मिळालेली नाही. त्यांचे नेतृत्व पाटण तालुक्यापुरतेच मर्यादित राहिले आहे.
वाई तालुक्यातील काँगे्रसचे माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव माजी आमदार मदन भोसले यांनी काँगे्रसचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले. किसन वीर साखर कारखान्याची सत्ता मिळविल्यानंतर त्यांनी साखर उद्योगातच विशेष लक्ष घातले. जावळीचा प्रतापगड कारखाना आपल्या कारखान्याच्या सहकार्याने सुरू ठेवला. खंडाळा सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवून हा कारखानाही सुरू केला आहे.
माजी मंत्री व वाई तालुक्याचे नेते दिवंगत मदनअप्पा पिसाळ यांच्यानंतर त्यांची पुढची पिढी राजकारणात आली. त्यांच्या सूनबाई अरुणादेवी पिसाळ यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तर पुत्र शशिकांत पिसाळ यांना कृषी सभापतीपद मिळाले आहे. पिसाळ-पाटील गट वाईच्या राजकारणात एकत्रितपणे वर्षानुवर्षे काम करत आहे. जावळी तालुक्याचे नेते माजी आमदार दिवंगत जी. जी. कदम यांच्यानंतर अमित कदम यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे युवकाध्यक्षपद त्यांना मिळाले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापतीपदही त्यांनी भूषविले. आता तर त्यांनी राष्ट्रवदाीतून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांना कोणती संधी मिळणार? याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नजरा आहेत.
खटावचे माजी आमदार दिवंगत भाऊसाहेब गुदगे यांच्या कुटुंबाकडे तालुक्याचे नेतृत्व कायम राहिले. त्यांचे चिरंजीव सुरेंद्र गुदगे यांनी काँगे्रस व आता राष्ट्रवादी असा प्रवास केला. मायणी जिल्हा परिषद गटापुरते त्यांचे नेतृत्व मर्यादित राहिले आहे. भविष्यात मोठ्या संधीची ते वाट पाहत आहेत. सध्या मात्र त्यांच्या घरातच वादळ उठलेले आहे. त्यांचे बंधू सचिन गुदगे हे भाजपमधून गावचे थेट सरपंच झाले आहेत. नेत्यांच्या पुढच्या पिढ्या राजकारणात येतात, त्यात काहीजण यशस्वी होतात तर काही जणांना मर्यादा येतात, असे चित्र आतापर्यंत पाहायला मिळाले. आमदार शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव तेजस जिल्ह्याच्या राजकारणात आले आहेत. त्यांच प्रवास कसा होतो, हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
राज्य पातळीवर नाव कमावण्याची संधी
नेत्यांचे चिरंजीव ही पहिली पायरी असली तरी संघटन कौशल्य आणि मुत्सद्दीगिरीच्या जोरावर राजकारणात पुढे जाण्याची संधी तेजस शिंदे यांना आहे. त्यांचे वडील आमदार शशिकांत शिंदे यांनी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राज्यात राजकारणात ठसा उमटविला आहे. तीच संधी तेजस यांच्यापुढे आहे. त्यासाठी वडिलांप्रमाणेच संघर्षाची तयारी त्यांना ठेवावी लागणार आहे.
सत्तेत नसलेल्या राष्ट्रवादीकडून शिंदेंचा सन्मान
केंद्रात व राज्यात सत्तेवर नसलेल्या राष्ट्रवादीला साताºयाचा बालेकिल्ला भक्कम ठेवायचा आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून येथील स्थानिक राजकारणावर पकड मिळविण्यात आमदार शशिकांत शिंदे यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या याच योगदानाचा यशोचित सन्मान राष्ट्रवादी पक्षाने केल्याची चर्चा आहे.

Web Title: Booster Dose for Family Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.