आघाडी मोडण्याचे पाप बोराटवाडी अन् उपळेकरांचे..!

By admin | Published: November 14, 2016 12:28 AM2016-11-14T00:28:45+5:302016-11-14T00:28:45+5:30

रामराजे नाईक-निंबाळकर : फलटणच्या सभेत विरोधकांवर घणाघात; शहरात कोणाची दहशत हे जनतेला माहित आहे

Boratavadi and children of sin! | आघाडी मोडण्याचे पाप बोराटवाडी अन् उपळेकरांचे..!

आघाडी मोडण्याचे पाप बोराटवाडी अन् उपळेकरांचे..!

Next

फलटण : ‘फलटण नगरपालिकेची सलग २५ वर्षे सत्ता जनतेने आमच्या हातात का दिली याचे विरोधकांनी आत्मचिंतन करावे. तुमच्या पक्षाचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून शहरासाठी तुम्ही काय केले, हे सांगावे. जिल्ह्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा काहीच उपयोग झाला नसून दोन्ही काँग्रेसची आघाडी मोडण्याचे पाप बोराटवाडी व उपळेकरांच्या सल्ल्याने केल्याचा आरोप विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केला.
पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीराम मंदिरात रामराजे यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी आ. दीपक चव्हाण, माजी आ. डॉ. कृष्णचंद्र भोईटे, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते डॉ. विजयराव बोरावके, सुभाषाराव शिंदे, बंटीराजे खर्डेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे,राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नीता नेवसे, अनुप शहा उपस्थित होते.
आमच्यावरील जनतेचा विश्वास आम्ही सार्थ ठरविला आहे,’ असे सांगून रामराजे म्हणाले, आमच्या काळातील रस्त्यावरचे खड्डे शोधण्यात विरोधक मग्न असून, चुकून त्यांच्या ताब्यात सत्ता आली तर ते पालिकेला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. शहरात दहशत कोणाची हे जनतेला माहीत आहे.
आज नगरपालिकेच्या अगोदर विधान परिषदेची निवडणूक होत असल्याने त्याकडे माझे जास्त लक्ष आहे. कारण मागच्या विधान परिषदेला आपल्या जिल्ह्याला उमेदवारी मिळाली होती. व जिल्ह्याचा आमदार झाला होता. यावेळेसही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हाला पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र, आपल्या जिल्ह्यातीलच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी बाहेरील उमेदवार उभा करून स्वत:च्या स्वार्थासाठी जिल्ह्याचा अपमान केल्याचा आरोप रामराजे यांनी केला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सत्तेवर असताना त्यांच्या माध्यमातून काँग्रेसने फलटण शहराच्या विकासासाठी किती निधी आणला हे जाहीर करावे. केवळ मलठणमधील एका प्रभागापुरता निधी असून, विरोधकांनी फलटणकरांचा अपमान केला आहे.
जिल्ह्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा काहीच उपयोग झाला नसून दोन्ही काँग्रेसची आघाडी मोडण्याचे पाप बोराटवाडी व उपळेकरांच्या सल्ल्याने केल्याचा आरोप रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)
रामराजे उवाच..
नगरपालिका निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही.
शहरातील रस्त्यावरील खड्ड्याचे राजकारण करीत विरोधक खड्डे मोजत आहेत.
चुकून त्यांच्याकडे सत्ता आली तर ते नगरपालिकेला खड्ड्यात घालतील.
हे उद्योगपती तर मी ही सभापती...
काँग्रेस आघाडी तुटली नसती तर ते विधानसभेला स्वाभिमानी बरोबर दिसले असते. त्यांच्याकडे निष्ठा नाही. त्यांच्याकडे एक साडेतीन फुटांचा तर एक साडेसहा फुटांचा नेता आहे. स्वत:ला ते उद्योगपती समजत असतील तर मीही सभापती आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्या हाती सत्ता येणार नाही,’ असा टोला रामराजे नाईक-निंबाळकर यांनी नाव न घेता दिगंबर आगवणे व रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना लगावला.

Web Title: Boratavadi and children of sin!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.