बोराटे, अंकुशवर दावा ठोकणार : शेखर गोरे
By admin | Published: October 31, 2014 12:47 AM2014-10-31T00:47:34+5:302014-10-31T00:48:23+5:30
सातारा : शेखर गोरे व अंकुश गोरे यांच्यात भागीदारीत असलेल्या मे. कमल एंटरप्राईजेस या संस्थेच्या संयुक्त खात्यातून
सातारा : शेखर गोरे व अंकुश गोरे यांच्यात भागीदारीत असलेल्या मे. कमल एंटरप्राईजेस या संस्थेच्या संयुक्त खात्यातून बनावट सही करून ५ कोटी ७० लाख रुपये काढून, त्या पैशाचा संगनमताने अपहार केल्याच्या तक्रारीवरून शेखर गोरे व इतरांवर गुन्हा नोंद केलेल्या गुन्ह्याच्या विरोधात अंकुश गोरे व महेश बोराटे यांच्या विरुद्ध ५० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे शेखर गोरे यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
याबाबत शेखर गोरे यांनी सांगितलेली माहिती अशी की, ‘मी माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून ‘रासप’या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेली होती. मी त्या निवडणुकीमध्ये पराभूत झालो. माझे निवडणूक प्रतिनिधी दत्तात्रय कुंडलिक घाडगे यांनी दि. १५ आॅक्टोबर ते १९ आॅक्टोबर अखरेच्या कालावधीत मतपेट्या सुरक्षिततेच्या बाबत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेजची सीडी मिळावी, यासाठी दि. २७ आॅक्टोबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी २५८ माण विधानसभा मतदारसंघ यांच्याकडे लेखी अर्जान्वये दिलेली होती. हे फुटेजमधील काही आक्षेपार्ह माहिती माझ्या हाती लागल्यास त्याचा विपरित परिणाम जयकुमार गोरे यांच्या राजकीय वाटचालीवर होईल म्हणून त्यांनी आमदार पदाचा दुरुपयोग करून हे फुटेज मला मिळू दिले नाही, तर अंकुश गोरे व जयकुमार गोरे यांनी संगनमताने माझ्याविरुद्ध खोटी केस दाखल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.’
शेखर गोरे म्हणाले, ‘खरी परिस्थिती अशी असून, मे. कमल एंटरप्रायजेस ही फर्म अंकुश गोरे व शेखर गोरे यांची पार्टनरशिपमधील कंपनी असून, या कंपनीचे रजि. आॅफिस अंकुश गोरे यांच्या पत्त्यावर आहे व बँकेतील खात्याशी संलग्न असलेला मोबाईल नं. हा देखील अंकुश गोरे यांचाच आहे. परंतु, गेली एक ते दीड वर्षे फर्ममध्ये असणारे संबंध दुरावले होते. फर्मच्या बँकेतील खात्यावर गेल्या एक-दीड वर्षात कोणताही व्यवहार झाला नव्हता.
या फर्मचा टॅक्स भरण्यास विलंब झाला व या फर्मचे रजि. आॅफिस अंकुश गोरे यांच्या पत्त्यावर असल्यामुळे अंकुश गोरे यांना या गोष्टीचा त्रास होत होता. त्यामुळे अंकुश गोरे यांचे मार्गदर्शक सीए जैन यांनी मला संपर्क केला व विनंती केली की, मे. कमल एंटरप्रायजेस या फर्मचा टॅक्स भरणे गरजेचे आहे. परंतु अंकुश गोरे हे माझे व्यवसायातील पैसे देणे असल्यामुळे मी तयार होत नव्हतो. तेव्हा जैन यांनी माझे पैसे देण्याची जबाबदारी घेतली त्यानंतर मे. कमल एंटरप्रायजेसचा टॅक्स रक्कम ८५ लाख ३६ हजार १९१ एवढ्या रक्कमेचा चेक दि. १२ सप्टेंबर रोजी जैन यांच्या नावे टॅक्स भरणे कामी दिला, त्याच दिवशी अंकुश गोरे यांनी स्वत: पाच लाख एवढ्या रकमेचा चेक स्वत:साठी घेतला व माझी येणे असलेली रक्कम पाच कोटी ७० लाख (चेक नं. ०००७२५) असे तीन वेगवेगळे चेक तयार केले. त्यापैकी माझे देय रकमेचा ५ कोटी ७० लाखांचा चेक एक महिन्याच्या मुदतीचा म्हणजेच १३ आॅक्टोबर २०१४ या तारखेचा होता. त्यानुसार मी तो चेक दि. १३ आॅक्टोबरला दिला.
जर मी खोट्या सह्या केल्या असतील तर त्यांनी बँकेत जमा केलेला चेक वटते वेळीस अंकुश गोरे यांना त्यांच्या मोबाईलवर खात्यातून रक्कम कमी झाल्याबाबतचा मेसेज मिळाला, त्यावेळी त्यांनी याची तक्रार का केली नाही? गुन्हा नोंद करून घेताना पोलिसांनी बँकेतील चेकवरील सह्या न तपासता दबावापोटी गुन्हा का नोंद केला? चेकवरील अंकुश गोरे यांची सही खोटी आहे, तर बँकेतील अधिकाऱ्याने एवढी मोठी रक्कम वर्ग कशी केली?, असे पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)