Satara News: बोरगावचे जवान सुभाष उंबरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 04:46 PM2023-02-13T16:46:20+5:302023-02-13T16:46:42+5:30

अमित जगताप नागठाणे : बोरगाव येथील सैन्यात नायब सुभेदारपदी कार्यरत असणारे सुभाष हिरालाल उंबरे (वय-३८) यांचे देशसेवा बजावत असताना ...

Borgaon jawan Subhash Umbre was cremated with state honors | Satara News: बोरगावचे जवान सुभाष उंबरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Satara News: बोरगावचे जवान सुभाष उंबरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

googlenewsNext

अमित जगताप

नागठाणे : बोरगाव येथील सैन्यात नायब सुभेदारपदी कार्यरत असणारे सुभाष हिरालाल उंबरे (वय-३८) यांचे देशसेवा बजावत असताना अल्प आजाराने निधन झाले. सुभाष उंबरे हे सध्या उत्तर प्रदेशातील आग्रा येथे देशसेवा बजावत होते. त्यांच्यावर आज, सोमवारी बोरगाव या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘नायब सुभेदार सुभाष उंबरे अमर रहे...’च्या जयघोष करण्यात आला.

शहीद सुभाष उंबरे ते सैन्यात ईएमई क्लार्क पदावर कार्यरत होते. त्यांना नुकतीच नायब सुभेदारपदी पदोन्नती झाली होती. त्यांचा बोरगावातील विविध सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग असायचा. नवतरुण दुर्गामाता तालीम संघ या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले होते. नागठाण्यातील श्रीरामकृष्ण विद्यालयातून त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. खंडाळा येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असताना ते सैन्यात भरती झाले.

त्यांचे पार्थीव आज, सोमवारी सकाळी दहा वाजता सातारा तालुक्यातील बोरगाव या मूळ गावी आणले. त्यावेळी त्यांची आई, पत्नी आणि मुलगी सोबतच भाऊ यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. त्यांचे घरापासून अगदी स्मशानभूमीपर्यंत सडा टाकून रांगोळी काढली होती. तिथून त्यांचे घरापासून ते खालची वस्ती पुढे स्मशानभूमी पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नागठाणे तसेच बोरगावमधील समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते. ‘नायब सुभेदार सुभाष उंबरे अमर रहे’, ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम’ या घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर परिसरातील बोरगाव गावातील संपूर्ण दुकाने दिवसभर बंद करून व्यापाऱ्यांनीही आदरांजली वाहिली. 

एनसीसी तसेच सुभेदार चंद्रकांत पवार, कल्याण संघटक, जिल्हा सैनिक अधिकारी, सहायक जिल्हा सैनिक अधिकारी, सुभेदार विलासराव घाडगे, हवालदार राजेंद्र जगदाळे, कैलास जाधव, नायब तहसीलदार दयानंद कोळेकर, गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे, सहायक गटविकास अधिकारी जयवंत साळुंखे, बोरगावचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, मंडलाधिकारी विठ्ठल तोरडमल, तलाठी सुहास जाधव, अनुराधा सवई, सरपंच सतीश साळुंखे, उपसरपंच अमित साळुंखे, ग्रामविकास अधिकारी सदाशिव खांडके, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन जयवंत साळुंखे, व्हाईस चेअरमन आप्पासाहेब कोळेकर यांनी आदरांजली वाहिली. पोलिसांनी बंदूकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. यानंतर त्यांचा भाऊ आणि मुलगीने मुखाग्नी दिला.

Web Title: Borgaon jawan Subhash Umbre was cremated with state honors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.