नागठाणेत चक्री जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांचा छापा, बारा संशयितांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 05:54 PM2022-03-26T17:54:21+5:302022-03-26T17:54:48+5:30
नागठाणे येथे चक्री जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
नागठाणे : नागठाणे येथे चक्री जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी बारा संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जुगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
आनंद दिनकर खोटे, गणेश जनार्दन नलवडे, रोहित संजय बोडरे, हाजी बाशासाब मुल्ला, सुभाष दिनकर साळुंखे, सूरज अनिल काळे, दीपक उत्तम तोरणे, अशोक हणमंत मोहिते (सर्व रा. नागठाणे), दत्तात्रय रघुनाथ जाधव, सौरभ प्रकाश घोरपडे (दोघे रा. शेंद्रे) आणि सूरज शंकर जाधव (रा. अतित) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना नागठाणे हद्दीत पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सेवारस्त्यावरील चौंडेश्वरी पान टपरीचे मागे पत्र्याचे टपरीमध्ये चक्री जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. याठिकाणी शून्य ते नऊ अशा आकड्यावर लोकांकडून दहा रुपयांना शंभर रुपये असे स्वतःचे फायद्यासाठी चक्री नावाचा जुगार सुरु होता. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला असता काही इसमही पैसे लावून खेळत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली. संशयित इसमाना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी (एमएच ११ सीई २१४४), संगणक, माऊस, राउटर, सीपीयु, युपीएस, असा ७१ हजार ६४० रुपयेचा माल जप्त केला. पोलीस अधिक तपास करीत आहेत.