बोरगाव पोलिसांची नागठाणे ग्रामपंचायतीत "सिंघम" गिरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 05:49 PM2020-07-29T17:49:09+5:302020-07-29T17:55:48+5:30

बोरगाव पोलिसांच्या ''वाघाने'' नागठाणे ग्रामपंचायतीत घुसून ''सिंघम'' गिरी केली. या प्रकारानंतर भडकलेल्या ग्रामसमितीने पोलिसांवर कठोर कारवाई करण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे घातले.

Borgaon police's 'Singham' falls in Nagthane gram panchayat! | बोरगाव पोलिसांची नागठाणे ग्रामपंचायतीत "सिंघम" गिरी!

बोरगाव पोलिसांची नागठाणे ग्रामपंचायतीत "सिंघम" गिरी!

Next
ठळक मुद्देबोरगाव पोलिसांची नागठाणे ग्रामपंचायतीत ''सिंघम'' गिरी!ग्रामसेवकाला दमदाटी : पालकमंत्र्यांकडे तक्रार; पोलिसांचा ग्रामस्थांकडून निषेध

सातारा : कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या भागांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यासाठी निघालेल्या नागठाणे ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासोबत बोरगाव पोलिसांची शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर आपल्या पोलिस शिपायाला अरे तुरे करतो असे म्हणत बोरगाव पोलिसांच्या ''वाघाने'' नागठाणे ग्रामपंचायतीत घुसून ''सिंघम'' गिरी केली. या प्रकारानंतर भडकलेल्या ग्रामसमितीने पोलिसांवर कठोर कारवाई करण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे घातले.

कोरोनाच्या काळात गावांमधील वादाबरोबरच यंत्रणांमधील हेवेदावे पुढे येत आहेत. सोमवारी (दि. २७) नागठाणे गावामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्याने ग्रामविकास अधिकारी सचिन पवार यांना ज्या भागामध्ये रुग्ण आढळला आहे.

त्या भागांमध्ये प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पवार त्या भागामध्ये दुचाकीवरून निघाले होते, तेव्हा नागठाणे गावच्या कमानीजवळ उभ्या असलेल्या पोलिसांनी त्यांना थांबवले तसेच कुठे निघाला आहात? असे विचारले.

त्यावर ''मी ग्रामसेवक आहे, प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी निघालो आहे, मला आपण ओळखत नाही का ? असा प्रतिप्रश्न केला, त्यानंतर संबंधित पोलिस शिपायाने तुझ्या कपाळावर तसे लिहिले आहे का ? असे विचारले त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही.

बोरगाव पोलिसांचे पथक वाहनातून सोमवारी रात्री साडे सातच्या सुमारास थेट नागठाणेत दाखल झाले. ग्रामपंचायतीमध्ये घुसून त्यांनी पुन्हा ग्रामविकास अधिकारी सचिन पवार यांना अर्वाच्च भाषेत दमदाटी केली.

दरम्यान, या प्रकरणाबाबत पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कोरोना ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

या समितीच्यावतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणाबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागठाणे ग्राम समितीच्यावतीने करण्यात आलेली आहे.

नागठाणेत रिक्षा फिरवून पोलिसांचा निषेध

नागठाणे येथे कोरोना ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती च्या वतीने सोमवारी घडलेल्या प्रकारात बाबत गावातून रिक्षा फिरवून बोरगाव पोलिसांचा तीव्र निषेध करण्यात आला


जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार लॉकडाऊन काळामध्ये कुणालाही डबलसीट दुचाकीवरून जाता येणार नाही. नागठाणे येथे ड्यूटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने आपलं कर्तव्य बजावले आहे. संबंधित ग्रामसेवकाने आपली तोंडी ओळख करून देत असताना आयकार्ड दाखवले असते तर कोणतीच हरकत नव्हती. मात्र तसे न करता संबंधिताने पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली. माझ्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला उद्धटपणे एखादा व्यक्ती बोलत असेल तर त्याचे स्पष्टीकरण मी करायला गेलो तेव्हा माझ्याशी देखील संबंधित ग्रामसेवकाने हुज्जत घातली. याबाबतचा सविस्तर अहवाल मी पोलीस उपाधीक्षक यांना पाठविला आहे.
- सागर वाघ,
सहायक पोलीस निरीक्षक, बोरगाव

Web Title: Borgaon police's 'Singham' falls in Nagthane gram panchayat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.