तडीपारीचा भंग करणाऱ्या दोघांना अटक, कार्वेत कारवाई : पाठलाग करून पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:45 AM2019-04-01T11:45:10+5:302019-04-01T11:46:42+5:30
कऱ्हाड : तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. कार्वे, ता. कऱ्हाड येथे शुक्रवारी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे ...
कऱ्हाड : तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. कार्वे, ता. कऱ्हाड येथे शुक्रवारी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने ही कारवाई केली.
सागर सदाशिव हुलवान (वय २३) व विशाल सदाशिव हुलवान (२३, दोघेही रा. कार्वे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्वे येथील सागर हुलवान आणि विशाल हुलवान या दोघांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. मात्र, तडीपारी आदेशाचा भंग करून हे दोघेजण कार्वे येथे वावरत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक चंद्रकांत माळी, पोलीस नाईक शशिकांत काळे, सज्जन जगताप, शशिकांत घाडगे आणि अमित पवार यांच्या पथकाने शुक्रवारी कार्वे येथे छापा टाकला
संशयित सागर हुलवान हा कार्वे-कोडोली रस्त्यावर पोलिसांना आढळून आला. पोलिसांना पाहताच त्याने पलयान केले. मात्र, पोलीस पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. तर विशाल हुलवान हा गावातील अहिल्यानगरमध्ये होता.
त्यानेही पोलिसांना पाहताच उसाच्या शेतातून धूम ठोकली. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून उसाच्या फडातच त्याला ताब्यात घेतले. दोघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. याबाबतची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून, सहायक निरीक्षक चंद्रकांत माळी तपास करीत आहेत.