दारूच्या नशेत शिव्या दिल्याच्या रागातून खुनी हल्ला, दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 04:07 PM2020-06-04T16:07:44+5:302020-06-04T16:09:08+5:30
दारूच्या नशेत शिव्या दिल्याच्या रागातून चिपळूणकर बाग परिसरातील गणेश घाडगे याच्यावर खूनी हल्ला केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : दारूच्या नशेत शिव्या दिल्याच्या रागातून चिपळूणकर बाग परिसरातील गणेश घाडगे याच्यावर खूनी हल्ला केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
विशाल दत्तात्रय घाडगे, उषा दत्तात्रय घाडगे (दोघे रा. चिपळूणकर बाग, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहते. आशा गणेश घाडगे (वय २८, रा. चिपळणूकर बाग, परिसर मंगळवार पेठ, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आशा घाडगे व वरील संशयित हे एकाच परिसरातील रहिवाशी असून आशा घाडगे यांचे पती गणेश घाडगे यांनी विशाल याला दारूच्या नशेत शिवीगाळ केली होती. त्याचा राग मनात धरून संशयितांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात गणेश याच्या डोक्याला व कानाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
त्यानंतर आशा घाडगे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळाला भेट देऊन शाहूपुरी पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी विशाल घाडगेला अटक केली.