फसवणूकप्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षासह दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 03:21 PM2020-11-07T15:21:29+5:302020-11-07T15:24:21+5:30
Mahabaleshwar Hill Station, Police, fraud, Crime News, Satara area न्यायालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणारे महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष संतोष मारुती आखाडे व नीलेश रामदास थोरात यांच्या विरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदा लक्ष्मण चोरमले (वय ५३, रा. कासवंड, ता. महाबळेश्वर) यांनी आखाडे व थोरात यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
महाबळेश्वर : न्यायालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणारे महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष संतोष मारुती आखाडे व नीलेश रामदास थोरात यांच्या विरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदा लक्ष्मण चोरमले (वय ५३, रा. कासवंड, ता. महाबळेश्वर) यांनी आखाडे व थोरात यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीमध्ये फिर्यादी चोरमले यांनी म्हटले आहे की, न्यायालयात विविध पदाकरिता जागा निघाल्या असून, न्यायाधीशांचे अंगरक्षक नीलेश रामदास थोरात हे माझ्या परिचयाचे आहेत. त्यांनी अनेकांना न्यायालयात नोकऱ्या लावल्या आहेत. तुमच्या मुलाला नोकरी नाही, मी तुमच्या मुलाच्या नोकरीचे काम करू शकतो. शिपाई पदासाठी दोन लाख, लिपिक पदासाठी अडीच लाख तर स्टेनो पदासाठी तीन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
संतोष आखाडे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पैशांची जुळवाजुळव करून नीलेश थोरात यांच्या खात्यावर अडीच लाख रुपये त्यानंतर पाच लाख, पन्नास हजार असे आरटीजीएस करून त्यांच्या बँक खात्यामध्ये भरले व संतोष आखाडे यांना दीड लाख रुपये रोख घरी नेऊन दिले. अशा प्रकारे त्यांना नऊ लाख रुपये दिले. २०१८ मध्ये न्यायालयाची पहिली यादी जाहीर झाली. या यादीमध्ये मुलांची नावे नव्हती. याबाबत संतोष आखाडे यांच्याकडे चौकशी केली असता ह्यपुढील यादीमध्ये तुमच्या मुलांची नावे असतील काळजी करू नका,ह्ण असे आखाडे यांनी मला सांगितले. मात्र त्यानंतर आलेल्या यादीमध्ये देखील आमच्या मुलांची नावे नव्हती पुन्हा आम्ही आखाडे यांची भेट घेतली असता त्यांनी पैसे परत न करता दमदाटी शिवीगाळ केली व उडवाउडवीची उत्तरे दिली.
संतोष अखाडे यांनी आमच्याप्रमाणेच इतर अनेकांची फसवणूक केल्याचे आम्हाला समजले. काही लोकांनी एकत्र येऊन संतोष आखाडे यांची भेट घेतली. तेव्हा आमच्या पूर्वीच तेथे ३० ते ३५ फसवणूक झालेले लोक उपस्थित होते. सर्वांकडून संतोष आखाडे व नीलेश थोरात यांनी सुमारे ४९ लाख रुपये घेऊन आमची फसवणूक केली असे आनंदा लक्ष्मण चोरमले यांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे.