दोन्ही राजेंची बैठक झाली; पण आम्ही नाय पाहिली- खासदार-आमदारांची एकत्र गुफ्तगू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:46 AM2019-03-20T00:46:28+5:302019-03-20T00:46:49+5:30
प्रगती जाधव-पाटील । सातारा : मनोमिलनाचं रोपटं पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या मनात रुजविण्यासाठी योग्य वेळेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आमदार-खासदार यांची गोपनीय ...
प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : मनोमिलनाचं रोपटं पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या मनात रुजविण्यासाठी योग्य वेळेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आमदार-खासदार यांची गोपनीय बैठक साताऱ्यात झाली. या बैठकीतील चर्चा माध्यमांपर्यंत पोहोचलीही; पण याविषयी आमदार गटाने तोंडावर बोट ठेवले आहे. त्यामुळे दोन्ही राजेंची बैठक झाली; पण आम्ही नाही पाहिली, असे चित्र निर्माण केले जात आहे.
सातारा पालिका निवडणुकांच्या निमित्ताने दीड दशकांपूर्वी राजघराण्यातीलज्येष्ठांच्या पुढाकाराने झालेल्या मनोमिलनाला गत निवडणुकीत उभा तडा गेला. या निवडणुकीत तरबेज डावपेच आणि मतांची योग्य गोळाबेरीज करून उदयनराजे यांनी वेदांतिकाराजेंविरोधात सामान्य महिलेला नगराध्यक्षा पदाच्या खुर्चीवर बसविले.
मात्र, या निवडणुकीनंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी ‘आरे ला कारे’ उत्तर द्यायचं ठरवलं. त्यानंतर ठोका-ठोकी, धुमसा-धुमसी इथपासून खुन्नस देण्यापर्यंतचे सर्व प्रकार सातारकरांनी पाहिले. दोन्ही राजेंच्यामध्ये असेच तणावपूर्ण वातावरण राहिले तर लोकसभेच्या निवडणुकीत काही गंभीर प्रसंग उद्भवतील, अशी शंकाही उपस्थित केली जात होती. पण पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलेले आदेश आणि जिल्ह्यातील अन्य आमदारांनी दिलेली साद बघता या दोन्ही राजेंचे मनोमिलन होणार, अशी खात्री सामान्यांना होतीच.
सोमवारी रात्री उशिरा उदयनराजे कºहाडहून साताºयाच्या दिशेने येत असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेण्याबाबत सांगितले. त्यानुसार रात्री दहाच्या सुमारास हे दोन्ही नेते आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह हॉटेलात दाखल झाले.उदयनराजे यांनी भेटायला आलेल्या शिवेंद्रसिंहराजे यांच्याबरोबर सुमारे दीड तास चर्चा केली. या चर्चेत पालिका निवडणुकांच्यावेळी निर्माण झालेले गैरसमज, चुकीच्या पद्धतीने मिळालेले निरोप यासह शहरात शांतता आणि विकास साधायचा असेल तर एकत्र येणं गरजेचे असल्यावर एकमत झाले.
राजघराण्यातील मोठ्या वादांवर पडदा टाकून दीड दशकांपूर्वी केलेले मनोमिलन आणि त्या तुलनेने गेल्या काही वर्षांतील वाद किरकोळ असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
साताºयाच्या विकासासाठी परस्परांना मदत करून पुढे जाण्याचंही यावेळी निश्चित करण्यात आलं. त्यानंतर दोन्ही राजेंनी एकत्र अर्धा तास कमरा बंद चर्चा केली.
भेटीतला ७ आकडा साथ देणार?
सातारा येथील पोवई नाका परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांची सोमवारी रात्री दहाच्या सुमारास भेट घेतली. या भेटीसाठी उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सुनील काटकर, नरेंद्र पाटील उपस्थित होते. या भेटीसाठी हॉटेलात येताना शिवेंद्रसिंहराजे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ७० क्रमांक असलेल्या गाडीतून आले. ही बैठक झाली त्या खोलीचा क्रमांकही ७७ आहे. या भेटीतील ७ आकडा साथ देणारा ठरणार, असा कयास व्यक्त होत आहे.