विद्यार्थिनीशी गैरवर्तणूक करणारे दोघे शिक्षक सेवामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:09 PM2020-02-26T23:09:58+5:302020-02-26T23:12:02+5:30
पाटण तालुक्यातील एका शाळेवर कार्यरत असताना उपशिक्षक भगवान लोहार यांनी विद्यार्थिनीबरोबर गैरवर्तणूक केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला होता. याबद्दल त्यांचे निलंबन करून चौकशी करण्यात आली.
सातारा : जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या दोघा शिक्षकांना सेवेतून सक्तीने मुक्त करण्यात आले असून, एका केंद्रप्रमुखाची मुख्याध्यापक पदावर पदावनती करण्यात आली आहे. शालेय कामादरम्यानच्या गैरवर्तणुकीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी ही कारवाई केली आहे. तसेच या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत भगवान बाबासो लोहार (उपशिक्षक), चंद्रकांत पांडुरंग राजे (उपशिक्षक) आणि हणमंत पांडुरंग कदम (केंद्रप्रमुख) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
पाटण तालुक्यातील एका शाळेवर कार्यरत असताना उपशिक्षक भगवान लोहार यांनी विद्यार्थिनीबरोबर गैरवर्तणूक केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला होता. याबद्दल त्यांचे निलंबन करून चौकशी करण्यात आली. त्यामध्ये लोहारवरील गैरवर्तणूक व इतर आरोप सिद्ध झाले. भगवान लोहार यांना जिल्हा परिषदेच्या सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील एका शाळेत चंद्रकांत राजे हे उपशिक्षक होते. त्यांनी कोरेगाव तालुक्यातील एका शाळेतील विद्यार्थिनीशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावले होते. त्यानंतर निलंबन करून चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. यामुळे उपशिक्षक राजेवर जिल्हा परिषदेच्या सेवेतून मुक्त केले.
माण तालुक्यातील शाळेत हणमंत कदम हे केंद्रप्रमुख आहेत. त्यांच्यावर खटाव तालुक्यातील केंद्र शाळेत कार्यरत असताना शिक्षकांबरोबरच सौहार्दपूर्ण संबंध न ठेवणे, पदाचा गैरवापर करून मुख्याध्यापक, शिक्षकांना त्रास देणे व इतर काही आरोप ठेवले होते. त्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. आरोप सिद्ध झाल्याने त्यांची केंद्रप्रमुख पदावरून मुख्याध्यापक पदावनती करण्यात आली आहे.
दोघा शिक्षकांना गैरवर्तणुकीबद्दल सक्तीने निवृत्त, तर एका केंद्रप्रमुखाची पदावनती करण्यात आली आहे. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. या कारवाईमुळे पालकांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होईल.
- संजय भागवत, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद