चोरीप्रकरणी दोघांना दोन वर्षांची शिक्षा
By admin | Published: March 25, 2017 11:48 PM2017-03-25T23:48:55+5:302017-03-25T23:48:55+5:30
महाबळेश्वर न्यायालयाचा निर्णय
महाबळेश्वर : येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या चोरी प्रकरणातील दोघा आरोपींना न्यायालयाने दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. ऐलान शेख (वय २४, रा. गवळी मोहल्ला) व सुशील सुर्वे (२३, रा. रांजणवाडी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, क्षेत्र महाबळेश्वर-डचेस रोड येथील हॉटेल गौरीशमध्ये गोव्याचे पर्यटक गुरुनाथ बांदोडकर व अमेय बांदोडकर हे १७ जून २०१६ रोजी आले होते. याच दिवशी पहाटेच्या सुमारास ऐलान शेख व सुशील सुर्वे या दोघांनी बांदोडकर यांच्या खोलीच्या खिडकीचा दरवाजा उघडून खोलीतील दोन मोबाईल व इतर वस्तू असा ९० हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. बांदोडकर यांनी याबाबत महाबळेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिस निरीक्षक राजेंद्र्र राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून ऐलान शेख व सुशील सुर्वे यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले होते. तसेच त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद केला होता. यानंतर संबंधितांवर न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले.
दरम्यान, शनिवारी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. न्यायमूर्ती पी. ए. कुंभोजकर यांनी साक्ष व पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींना चोरीच्या गुन्ह्यात दोषी धरून त्यांना दोन वर्षे सक्तमजुरी आणि २५० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. सरकारी पक्षातर्फे अॅड. बी. एन. पेटकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)