बबलूच्या पुतण्यासह दोघांना अटक
By admin | Published: July 24, 2015 12:15 AM2015-07-24T00:15:46+5:302015-07-25T01:14:36+5:30
कऱ्हाडातील टोळीयुद्ध : बाबरला ठेचल्याची कबुली; घटनास्थळी बबलू-बाबरचा वाद
कऱ्हाड : बबलूचा गोळ्या झाडून खून केल्यानंतर बाबरला ठेचून ठार मारल्याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांनी बबलूच्या पुतण्यासह आणखी एकास अटक केली आहे. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून, आणखी काहीजणांचा त्यामध्ये हात असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस त्या संशयितांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, बाबरने गोळ्या झाडण्यापूर्वी बबलूशी त्याचे बोलणे झाले होते. अवघ्या काही सेकंदाच्या त्या चर्चेवेळी बबलू व बाबरचा खटका उडाला. तसेच दोघांची झटापट झाली. त्यानंतर क्षणार्धात बाबरने स्वत:जवळील पिस्तूल काढून बबलूवर गोळ्या झाडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार पोलीस या साक्षीदारांकडून मिळत असलेल्या माहितीवरून तपासाची दिशा निश्चित करीत आहेत.
बाबर खानच्या खूनप्रकरणी पोलिसांनी बबलूचा पुतण्या सागर चंद्रकांत माने (वय २५) व हृषिकेश आनंदा शेंदरे (२३, दोघेही रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड) या दोघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबर पालिकेकडील रस्त्यावरून बबलू असलेल्या ठिकाणी आला. त्यावेळी दोघेही समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर झटापट होऊन काही सेकंदाच्या आत बाबरने स्वत:जवळील पिस्तुलातून बबलूवर गोळ्या झाडल्या. यावेळी बबलूचा पुतण्या सागर त्याठिकाणी होता. बबलू व त्यानंतर त्याची आई अनुसया यांना गोळ्या घातल्यानंतर बाबर तेथून जाण्याच्या प्रयत्नात असताना जमावातील एकाने त्याला पाठीमागून पकडले. तसेच त्याच्याशी झटापट झाली. त्यावेळी बाबरच्या हातातील पिस्तूल खाली पडले. त्यानंतर जमावाने त्याच्यावर हल्ला करून त्याच्या डोक्यात सिमेंटची पाईप घातली. तसेच दगडाने ठेचून त्याचा खून केला. या खून
प्रकरणात सागर माने व हृषिकेश शेंदरे सहभागी असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांशिवाय अन्य काहीजण संशयित आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
बबलूच्या खून प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. काही संशयितांची नावेही निष्पन्न झाली आहेत. मात्र, अद्याप कोणालाही पोलिसांनी अटक केलेली नाही. पोलीस त्या संशयितांचा शोध घेत आहेत. तसेच सर्व शक्यता गृहित धरून तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
बाबरची पिस्तूल नादुरुस्त
बबलूवर दोन गोळ्या झाडल्यानंतर अनुसया यांनी बाबरला प्रतिकार केला. त्यावेळी बाबरने त्यांच्या दिशेनेही दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी अनुसया यांच्या पायाला लागली, तर दुसरीचा नेम चुकला. दोन जिवंत काडतुसे पोलिसांना घटनास्थळी मिळाले. सातवी गोळी बाबरच्या पिस्तुलातच अडकून पिस्तूल नादुरुस्त झाले, असे पोलिसांनी सांगितले.
बबलू-बाबर संभाषण महत्त्वाचे
घटनेवेळी बबलू आणि बाबर खान समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात संभाषण झाले होते. हे संभाषण म्हणजे वाद होता आणि या वादानंतर झटापटही झाली होती. हे सर्व काही सेकंदात झाले होते. मात्र, बबलू आणि बाबरमध्ये त्यावेळी जे संभाषण झाले, ते तपासाच्या दृष्टीने पोलिसांसाठी महत्त्वाचे आहे. त्यानुसारच सध्या पोलीस तपास सुरू आहे.