दुचाकींच्या धडकेत दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2016 12:39 AM2016-02-23T00:39:43+5:302016-02-23T00:39:43+5:30
एकजण गंभीर : गोरे बंधूंनी जखमींना रुग्णालयात हलविले
वडूज : खटाव तालुक्यातील गोपूज येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला. शंकर बिरू माने (वय ४५, रा. उपाळे-मायणी, ता. कडेगाव) व योगेश सदाशिव कदम (२३, रा. पुसेसावळी, ता. खटाव) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शंकर माने हे उपाळे-मायणीहून पुसेसावळी मार्गे वडूज येथे आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी दुचाकी (एमएच १० बीएच ५५०५) वरून येत होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गोपूज शाळेसमोर त्यांची दुचाकी आली असता समोरून आलेल्या दुचाकीची धडक बसली. या दुचाकीवर योगेश कदम व आकाश दादासाहेब कदमङ्कहे चुलत बंधू होते. त्यामध्ये शंकर माने व योगेश कदमङ्कगंभीर जखमी झाले.
आमदार प्रभाकर घार्गे यांच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी पळशी येथे जात असलेल्या आमदार जयकुमार गोरे व राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस शेखर गोरे हे दोघे दोन वाहनांतून पळशीकडे जात असताना अपघातस्थळी थांबले. त्यांनी स्वत:च्या वाहनांतून जखमींना वडूजला उपचारासाठी आणल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
शंकर माने यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर योगेश कदम यांना पुढील उपचारासाठी साताऱ्याला हलविण्यात आले. प्रवासातच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी आकाश कदमङ्कयाच्यावर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
योगेश व आकाश कदमङ्कहे मुंबईहून दोनच दिवसांपूर्वी पुसेसावळीत चुलत भावाच्या लग्नासाठी आले होते. काही कामानिमित्त ते वडूजला आले होते. वडूजहून परतत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. या अपघाताची नोंद औंध पोलीस ठाण्यात झाली असून, हवालदार बी. पी. खुस्पे तपास करीत आहेत.