कास तलावाजवळ आता बाटल्या,प्लास्टिक अन् मास्कचाही कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 05:11 PM2021-06-10T17:11:28+5:302021-06-10T17:19:56+5:30
: सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या व प्लास्टिक कचऱ्याचा ढीग साचला आहे. एवढेच नव्ह तर या कचऱ्यात फेकून दिलेल्या मास्कचाही समावेश झाला आहे. घाणीमुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून, निसर्गप्रेमींमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
पेट्री/सातारा : सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या व प्लास्टिक कचऱ्याचा ढीग साचला आहे. एवढेच नव्ह तर या कचऱ्यात फेकून दिलेल्या मास्कचाही समावेश झाला आहे. घाणीमुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून, निसर्गप्रेमींमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. तरीही अनेक तरूण व नागरिक कास पठार व तलाव परिसरात भटकंतीसाठी येत असतात. काही हुल्लडबाज तरुणांकडून तलावाच्या परिसरात पार्ट्या केल्या जातात. तसेच दारूच्या रिकाम्या बाटल्या, पिशव्या, ग्लास, पाण्याच्या बाटल्या, वापरलेले मास्क तलावाच्या आवारात फेकून दिले जातात. त्यामुळे जैवविविधतेने नटलेल्या या परिसरातील पर्यावरणाला बाधा पोहोचत आहे.
कास तलाव परिसरात दिवसेंदिवस कचऱ्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. अविवेकीपणामुळे या पर्यटनस्थळांचे निसर्गसौंदर्य हरवून बसण्याची चिंता निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत. या पर्यटनस्थळांचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने आपली मानसिकता बदलून स्वच्छता कशी राहील, यासाठी प्रयत्नशील असायला हवे. मात्र, असे होताना दिसत नाही.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर पर्यटनस्थळांवर बंदी असताना बहुसंख्य नागरिक पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत. कास तलावात जलविहार करणे, तेलकट भांडी साबण अथवा डिटर्जंटने धुणे, यामुळे पाणी दूषित होण्याचा धोका असून, जलचरांनादेखील धोका उद्भवू शकतो.