मागवला मोबाईल अन् हातात पडला बूट, नामांकित वस्तू स्वस्तात देत असल्याचे आमिष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 03:53 PM2018-07-04T15:53:43+5:302018-07-04T16:05:24+5:30
काही दिवसांपूर्वी मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. समोरून नामांकित कंपनीचा मोबाईल केवळ चार हजार रुपयांत मिळत असल्याचे सांगण्यात आले. या कॉलवर विश्वास ठेवून युवकाने लगेचच मोबाईलही बुक केला. काही दिवसांतच टपाल कार्यालयात त्याच्या नावाचे पार्सल आले.
औंध : काही दिवसांपूर्वी मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. समोरून नामांकित कंपनीचा मोबाईल केवळ चार हजार रुपयांत मिळत असल्याचे सांगण्यात आले. या कॉलवर विश्वास ठेवून युवकाने लगेचच मोबाईलही बुक केला. काही दिवसांतच टपाल कार्यालयात त्याच्या नावाचे पार्सल आले.
चार हजार रुपये भरून त्याने पार्सल ताब्यात घेतले अन् सत्य उघडकीस आले. त्या पार्सलमधून मोबाईलऐवजी चक्क शंभर-दोनशे रुपये किमतीचे बूट त्याच्या हाती पडले. खटाव तालुक्यातील औंध परिसरातील अनेक युवकांची अशा प्रकारच्या फसव्या कॉलने फसवणूक होत आहे.
औंध परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे कॉल येऊ लागले आहेत. कॉल आल्यानंतर हॅलो... नमस्कार... आपल्या मोबाईल नंबरची ही वस्तू घेण्यासाठी निवड झाली आहे. ही वस्तू एवढ्या किमतीची असून, आपणास ती कमी किमतीत मिळत आहे. बाजारभावापेक्षा आपले एवढे पैसे बचत होत आहेत, असे
सांगून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे.
औंध येथील एका युवकाला अशाच एका प्रसंगाला सामोरे जावे लागले. या युवकाला निनावी नंबरवरून आलेल्या फोनद्वारे नामांकित कंपनीच्या मोबाईलचे आमिष दाखविण्यात आले. पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल केवळ चार हजार रुपयांना मिळत असल्याचे त्याचे सांगण्यात आल्याने त्या फोनवर विश्वास ठेवला.
नाव व पत्ता सांगितल्यानंतर काही दिवसांतच गावातील टपाल कार्यालयात त्या युवकाच्या नावाचे पार्सल आले. ही माहिती मिळताच त्याने आनंदाच्या भरात टपाल कार्यालय गाठले आणि चार हजार रुपये भरून आलेले पार्सल आपल्या ताब्यात घेतले.
घरी आल्यानंतर त्याने पार्सल उघडून पाहिले असता त्याचा मोठा धक्काच बसला. पार्सलमध्ये मोबाईल ऐवजी शंभर-दोनशे रुपये किमतीचे बूट त्याच्या हाती पडले. आपली फसवणूक झाल्याचे युवकाच्या लक्षात आले. मात्र, घरच्यांच्या
भीतीमुळे त्याने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही.
अशा प्रकारच्या आणखी घटना औंध परिसरात घडल्या आहेत. परंतु बदनामीमुळे कोणीही याची वाच्यता केली नाही. नागरिकांनी अशा फसव्या फोन कॉल वरून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.