कोविडबाधित उघड्यावर अन् बाउन्सर गेटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:40 AM2021-05-19T04:40:50+5:302021-05-19T04:40:50+5:30
सातारा : साताऱ्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये संरक्षणार्थ ठेवण्यात आलेल्या बाउन्सरच्या निर्णयाच्या विरोधात मंगळवारी सातारा कोविड डिफेंडर्स (एससीडी) ग्रुपचे कार्यकर्ते ...
सातारा : साताऱ्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये संरक्षणार्थ ठेवण्यात आलेल्या बाउन्सरच्या निर्णयाच्या विरोधात मंगळवारी सातारा कोविड डिफेंडर्स (एससीडी) ग्रुपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. या निर्णयाचा निषेध नोंदवत त्यांनी बाउन्सर्स रुग्णसेवेला की रुग्णांच्या नातेवाइकांवर दहशत ठेवायला, असा संतप्त सवाल केला.
नियोजित छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या इमारतीत गेल्या वर्षभरापासून जम्बो कोविड सेंटर सुरू आहे. याठिकाणी आजपासून सुमारे १६ बाउन्सर खासगी व्यवस्थापनाने तैनात केले आहेत. या कृतीवर तीव्र प्रतिक्रिया साताऱ्यात उमटल्या. कोविडबाधित रुग्णांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या सातारा कोविड डिफेंडर्स ग्रुपच्या स्वयंसेवकांनी जम्बो कोविड सेंटरच्या दारात जमून या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला.
सातारा कोविड डिफेंडर्स ग्रुपचे प्रशांत मोदी, रवी पवार, प्रशांत नलवडे, पंकज नागोरी, असिफ खान, चिन्मय कुलकर्णी, जयश्री शेलार, सागर भोगांवकर, महारूद्र तिकुंडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना ग्रुपचे विनीत पाटील म्हणाले, ‘अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे, प्लाझ्मा मिळवून देणे, इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना आवश्यक सोय करून देण्यासाठी सातारा कोविड डिफेंडर्स ग्रुप गेल्या वर्षभरापासून कार्यरत आहेत. या रुग्णालयाच्या दारात रुग्णाच्या नातेवाइकांना शिस्त लावण्यासाठी प्रशासन बाउन्सर लावत असेल तर ही साताऱ्याची संस्कृती नाही. सातारकर हे कधीही सहन करणार नाहीत. आम्ही सर्व सातारकर म्हणून या कृत्याचा निषेध करतो.’
जम्बो कोविड सेंटरमधील व्यवस्थापन हे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली काम करते. जिल्हाधिकाऱ्यांनी बाउन्सर लावण्याला परवानगी दिली का व कशी, असा सवाल माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी उपस्थित केला. सातारा कोविड डिफेंडर्स ग्रुप अथवा इतर संस्था या ठिकाणी विनामूल्य सेवा करत आहेत. असे असताना त्यांना रोखण्यासाठी बाउन्सर ठेवले गेले आहेत. जाणीवपूर्वक कोणत्यातरी पुढाऱ्याच्या एजन्सीला आर्थिक हातभार लावण्यासाठी जंबो कोविड रुग्णालयात बाउन्सर ठेवले गेले आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. जम्बो कोविड सेंटरमधील दुष्कृत्ये उजेडात येऊ नयेत म्हणूनच बाउन्सर ठेवले गेले आहेत का? असा उद्विग्न सवालही त्यांनी यावेळी केला.
सातारा कोविड डिफेंडर्स ग्रुपच्या काही प्रतिनिधींनी मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, त्यांनीही बाउन्सर ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. सातारकर याप्रश्नी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट :
जम्बो कोविडला बाउन्सर का?
सातारा जिल्ह्यातील कोविड रुग्णांचे आशास्थान म्हणून जम्बो कोविड सेंटरकडे पाहिले जाते. गेल्या वर्षभरात येथे रुग्णसेवा सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, हे या सेेंटरचे वैशिष्ट्य. रुग्णाला दाखल केल्यानंतर आणि प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांसोबत आलेले नातेवाईक आधीच परिस्थितीने ग्रासलेले असतात. रुग्णाला उपचार मिळावेत ही त्यांची साधी अपेक्षा असते. त्यामुळे इथे कुठंही कोणताही नातेवाईक आक्रमक पवित्र्यात येत नाही. त्यांचा सूर हा विनंती करण्याचाच असतो. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जिथं आला नाही, तिथं काळ्या कपड्यांतील बाउन्सर कशासाठी? याचं कारण मात्र अद्यापही अस्पष्टच आहे.
पोलिसांच्या कर्तृत्वावर विश्वास नाही काय?
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या परवानगीने जिल्हा कोविड सेंटरच्या बाहेर बाउन्सर उभे करण्यात आले. शासनाच्या अखत्यारित असलेल्या या केंद्राच्या सुरक्षेची जबाबदारी जिल्हा पोलीस दलाकडे देणे अपेक्षित होते. मात्र, खासगी यंत्रणा लावून जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कर्तृत्वावर गैरविश्वास दाखविला असल्याचे मत एससीडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
पोलिसांपेक्षा बाउन्सर परवडणारे !
जम्बो कोविड सेंटर शासकीय उपचार देणारे केंद्र असले तरीही त्याचे व्यवस्थापन खासगी रुग्णालयाकडे आहे. काही दिवसांपूर्वी जंबो कोविड सेंटरच्या बाहेर दोन युवकांना मारहाण झाली होती. त्यावेळी बाहेर ऑक्सिजन प्लांटच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले पोलीस येईपर्यंत चांगलाच राडा झाला होता. या घटनेमुळे सेंटरच्या बाहेर काहीकाळ तणावाचे वातावरण होते. खासगी रुग्णालयाकडे व्यवस्थापन असल्यामुळे प्रशासनाकडे पोलिसांचे संरक्षण मागितले तर ते सशुल्क असेल. हे शुल्क देण्यापेक्षा बाउन्सर नेमणं त्यांना परवडणारे आहे, तसेच बाउन्सरवर खासगी व्यवस्थापनाला नियंत्रण ठेवणे सोयीचे असावे, हेही त्यामागचे कारण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.