कोविड सेंटर बाहेर बाउन्सर आता साध्या वेशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:43 AM2021-05-20T04:43:10+5:302021-05-20T04:43:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जम्बो कोविड सेंटरमध्ये नेमलेले बाऊन्सर साध्या वेशात असतील, दोनपेक्षा जास्त जण एकत्र थांबणार नाहीत, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जम्बो कोविड सेंटरमध्ये नेमलेले बाऊन्सर साध्या वेशात असतील, दोनपेक्षा जास्त जण एकत्र थांबणार नाहीत, कुणालाही उर्मट वागणूक मिळणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विविध मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी यांच्याकडून खूपच सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावेळी भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार यांनी दोन निवेदनेदेखील दिली.
जिल्ह्यात सातारा व कऱ्हाड येथे सुसज्ज ऑपरेशन थिएटर सह, १५ बेडचा स्वतंत्र मुकर म्युकरमायकोसिस सुरू केली जाणार आहेत. त्यापैकी साताऱ्यात ८ बेडचा कक्ष सुरूदेखील झाला आहे.
म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण जे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यांना औषधे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना जर गरज पडली तर सिव्हिल व जम्बो येथे प्राधान्याने दाखल करून घेण्यात येतील. लसीकरण बाबतीत पूर्व नियोजन शकतो रोज आदल्यादिवशी प्रसिद्ध केली जाणार आहेत.
यावेळी भारतीय जनता पार्टी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, वैद्यकीय आघाडी जिल्हा अध्यक्ष डॉ उत्कर्ष रेपाळ, युवा मोर्चा सातारा शहर अध्यक्ष विक्रम बोराटे उपस्थित होते.
दरम्यान, कोविड डिफेंडर ग्रुपच्या वतीने राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना जम्बो कोविड सेंटरबाहेर उभ्या केलेल्या बाऊन्सरच्या विरोधात निवेदन देण्यात आले. सातारा जिल्हा जम्बो कोविड हॉस्पिटलवर खासगी बाऊन्सर्स नेमून रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक, व सामाजिक संस्थांना अटकाव करुन दहशत निर्माण केली जात आहे. हॉस्पिटलची पारदर्शकता संपवून आत सुरु असलेल्या गैरकारभारांवर पडदा टाकला जात असून यात लक्ष घालण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
चौकट
परिस्थिती हाताळायला पोलिस सक्षम : देसाई
जर कोणी असे म्हणत असेल की आमचे पोलीस परिस्थिती हाताळण्यास कार्यक्षम नाही तर ते चुकीचे आहे. आमचे सातारा पोलीस दल प्रत्येक परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकते. मात्र बाऊन्सर्सबाबत काल माध्यमांमधून माहिती मिळाली. हा निर्णय सर्वस्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारितील आहे. याबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करून माहिती घेतो, असे आश्वासन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.