झाडाला दुचाकी धडकून मुलगा ठार
By admin | Published: May 14, 2016 11:45 PM2016-05-14T23:45:52+5:302016-05-14T23:45:52+5:30
एकाच गाडीवर चौघांचा प्रवास : अंगापूरजवळील अपघातात अन्य तिघे जखमी
अंगापूर : भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याकडेच्या झाडाला धडकली. या अपघातात सात वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, तिघेजण जखमी आहेत. हा अपघात अंगापूर फाटा ते अंगापूर या मार्गावर शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंगेश धनाजी ठोंबरे (वय ७) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ११ बीवाय ७००३ दुचाकीवरून चौघेजण शनिवारी दुपारी कोरेगाव येथून बाजार करून अंगापूरला येत होते.
नीलेश जाधव (वय ३५, रा. अंगापूर) हे गाडी चालवत होते. त्यांची दुचाकी अंगापूर रस्त्यावरील मठाजवळ आली असता गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी रस्त्याकडेच्या लिंबाच्या झाडाला जाऊन धडकली.
यावेळी गाडीच्या टाकीवर बसलेला मंगेश धनाजी ठोंबरे याचा मृत्यू झाला असून, दुचाकीस्वार नीलेश जाधव व श्रेयस दत्तात्रय कोळपे (३), विलास भोकरे हे किरकोळ जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावून जखमींना साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. या अपघाताची सातारा तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.
आजोबा-नातू जखमी
अपघातात ठार झालेला व जखमी सर्वजण मूळचे लोणंदचे असून, ते कुटुंबीयांसमवेत अंगापूरला मेंढ्या घेऊन आले होते. बाजारासाठी ते कोरेगावला गेले होते.
तेथून अंगापूरला परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. जखमी विलास भोकरे व त्यांच्या मुलीचा मुलगा नातू श्रेयस कोळपे हे दोघेही जखमी झाले आहेत.