ब्रह्मचैतन्य महाराजांचा दवाखाना कोरोना सेंटर म्हणून प्रशासनाकडे हस्तांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:42 AM2021-04-28T04:42:11+5:302021-04-28T04:42:11+5:30
म्हसवड : श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा दवाखाना कोरोना सेंटर म्हणून प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या ठिकाणी रुग्णांवर उपचार ...
म्हसवड : श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा दवाखाना कोरोना सेंटर म्हणून प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या ठिकाणी रुग्णांवर उपचार केले जातील. यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी पाठपुरावा केला होता, अशी माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी दिली.
गोंदवले बुद्रुक येथे गोंदवलेकर महाराज मठाचा दवाखाना आहे. त्याठिकाणी गरजू रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यासाठी शहरातील नामांकित डॉक्टर महिन्यातून एकदा येथे येऊन सेवा देतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक वर्षापासून हा दवाखाना बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, सध्या कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वत्रच कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. माण तालुक्यातील कोरोनाबधितांवर वेळीच उपचार व्हावेत म्हणून विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या प्रयत्नाने गोंदवल्यातील दवाखाना प्रशासनाला देण्यात आला आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांच्याकडे या दवाखान्याचे हस्तांतर करण्यात आले. यावेळी संजय भोसले म्हणाले, ‘शिवसेनेच्या प्रवक्त्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या प्रयत्नातून गोंदवल्यातील संस्थानच्या दवाखान्याचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आले आहे. या सेंटरच्या माध्यमातून माण तालुक्यातील रुग्णांची चांगली सोय होणार आहे.’
डॉ. कोडलकर म्हणाले, ‘कोरोना सेंटरसाठी प्रशासनाने संस्थानचा दवाखाना यापूर्वीच अधिग्रहण केला आहे. हा दवाखाना ताब्यात घेण्यात आला असून साधारण पंचवीस बेडच्या माध्यमातून कोरोनाबधित रुग्णांची चांगली सोय होईल.’
यावेळी मंदिराचे विश्वस्त वैद्यकीय अधिकारी डॉ. समीना तांबोळी तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
फोटो सचिन मंगरुळे यांनी मेल केला आहे.
गोंदवले बुद्रुक येथील गोंदवले संस्थानचा दवाखाना प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले उपस्थित होते. (छाया : सचिन मंगरुळे)