झुणका भाकर केंद्र रात्रीत जमीनदोस्त !

By admin | Published: April 19, 2017 10:58 PM2017-04-19T22:58:36+5:302017-04-19T22:58:36+5:30

साप...साप.. म्हणून बुलडोझर फिरविला : उद्ध्वस्त झालेल्या ढिगाऱ्यावरच महिलांचे आंदोलन

Bread bread at the center of the night! | झुणका भाकर केंद्र रात्रीत जमीनदोस्त !

झुणका भाकर केंद्र रात्रीत जमीनदोस्त !

Next



सातारा / शाहूपुरी : येथील सातारा मध्यवर्ती बसस्थानकातील झुणका भाकर केंद्रामध्ये झोपलेल्या लोकांना कारवाईचा सुगावा लागू नये म्हणून ‘साप आहे...साप आहे,’ अशी ओरड करून एसटी महामंडळाने मंगळवारी रात्री जेसीबीच्या साह्याने अखेर झुणका भाकर केंद्र जमीनदोस्त केले. त्यानंतरही दलित विकास महिला संघटनेने अस्ताव्यस्त झालेल्या केंद्रामध्येच ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे बसस्थानकात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
बसस्थानकातील झुणका भाकर केंद्राचा वाद गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. एसटी महामंडळाने न्यायालयात धाव घेऊन या झुणका भाकर केंद्राचा ९ फेब्रुवारीला ताबा घेतला होता. मात्र ‘आमच्यावर अन्याय झाला आहे,’ असा आरोप करत दलित महिला विकास महामंडळाच्या महिलांनी त्याच ठिकाणी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. काही महिलांनी कुलूप लावून स्वत:ला कोंडूनही घेतले होते. झुणका भाकर केंद्राला न्यायालयाच्या आदेशानंतर लावलेले सीलही तोडण्यात आले होते. या झुणका भाकर केंद्राचा ताबा महिलांनी घेऊ नये म्हणून एसटी महामंडळाने केंद्राबाहेर जेसीबीने मोठी चरही काढली होती.
रात्री या केंद्रामध्ये काही पुरुष झोपत होते. दरम्यान, मंगळवारी रात्री बारानंतर बसस्थानकात एसटी प्रशासनाच्या वेगळ्याच हालचाली सुरू झाल्या. कोणत्याही परिस्थितीत हे झुणका भाकर केंद्र उद्ध्वस्त करायचे, या हेतूने त्यांनी जेसीबीही बोलावून घेतला. आतमध्ये काहीजण झोपेत होते. यावेळी साप...साप.. असे म्हणून काही लोकांनी ओरड करण्यास सुरुवात केली. हे ऐकून केंद्रामध्ये झोपलेले दोन युवक बाहेर आले. त्यानंतर काही क्षणातच तयारीत असलेला बुलडोझर झुणका भाकर केंद्रावर फिरविण्यात आला.
स्वयंपाकाचे साहित्य, गॅस शेगडी, सिलिंडर, फ्रीज, टेबल, खुर्च्या, फर्निचर, कोल्ड्रींक्स, पाण्याच्या बाटल्या या साहित्याचा अक्षरश: चक्काचूर झाला. (वार्ताहर)
उद्ध्वस्त केंद्रामध्येच महिलांचा ठिय्या !
सातारा बसस्थानकातील झुणका भाकर केंद्र संबंधित महिलांच्या महामंडळाला भाडेतत्त्वावर चालवण्यास दिले होते. एसटी प्रशासन व महिला यांच्यात मालकी हक्कावरून वाद निर्माण झाला होता. दोन महिन्यांपूर्वीच न्यायालयाचा निकाल एसटी प्रशासनाच्या बाजूने लागला होता. या निकालानंतर ही तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हापासून महिलांनी केंद्रासमोरच मंडप टाकून ठिय्या मांडला होता. या घटनेनंतर महिला आणखीनच संतप्त झाल्या आहेत. उद्ध्वस्त झालेल्या केंद्रामध्येच त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Web Title: Bread bread at the center of the night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.