ऐन पावसाळ्यातही घ्यावं लागतंय विकतचं पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 02:13 PM2017-07-22T14:13:38+5:302017-07-22T14:13:38+5:30

दररोज ३६ हजार खर्च : शासनाच्या लोकसंख्येच्या चुकीच्या धोरणाचा वाठार स्टेशन ग्रामस्थांना फटका

Bread water needs to be taken in rainy season | ऐन पावसाळ्यातही घ्यावं लागतंय विकतचं पाणी

ऐन पावसाळ्यातही घ्यावं लागतंय विकतचं पाणी

Next

आॅनलाईन लोकमत

वाठार स्टेशन (जि. सातारा), दि. २२ : वाठार स्टेशनला लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे १९८० मध्ये शिधापत्रिकेवरील माणसी पंधरा लिटर पाणी शासनाकडून दिले जात होते. आत्ता या शिधापत्रिका गेल्या असल्या तरी परिस्थिती आहे तशीच आहे. शासनाच्या लोकसंख्या निकषामुळे गावाला दररोज ३६ हजाराचं पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. या गावाने सहा महिन्यांत पाण्यासाठी तब्बल १२ लाख रुपये खर्च केले.


वाठार स्टेशनची लोकसंख्या ५ हजार ८००. याप्रमाणे शासनाकडून गावाला दररोज १ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. परंतु प्रत्यक्षात व्यापार, शिक्षणानिमित्त व बाहेरील गावातून या ठिकाणी वास्तव्य करत असलेले तसेच दैनंदिन कामासाठी येणाऱ्या लोकांची संख्या गावच्या लोकसंख्येच्या तिप्पट आहे. त्यामुळे त्यांचा पाणीप्रश्न ग्रामपंचायतीला सोडवावा लागत आहे. वाठार स्टेशनला तरंगत्या लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे दररोज ४ लाख लिटर पाण्याची गरज आहे. परंतु प्रत्यक्षात १ लाख लिटरच पाणी मिळत असल्याने हे पाणी तब्बल १८ दिवसांनंतर या ग्रामस्थांना रोटेशननुसार मिळत आहे.


वाठार स्टेशनसाठी असलेल्या जलस्वराज्य प्रकल्पातील विहिरीत पाणीच नसल्याने ही योजना पूर्ण बंद आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार गावाला कोणताही हक्काचा ओढा, पाझर तलाव नाही. गावासाठी असलेल्या बारा हातपंपांपैकी जवळपास सहा हातपंप बंद अवस्थेत आहेत. सध्या सुरू असलेले सहा हातपंपही अखेरचीच घटका मोजत आहेत. त्यामुळे तीन हजार पाचशे लिटर क्षमतेचे पंधरा खासगी पाणी टँकर गावाची तहान भागवत आहेत. यासाठी ग्रामपंचायत दररोज सुमारे ३२ हजारांचा खर्च ग्रामस्थांवर करत आहे.


वाठार स्टेशन आणि खासगी टँकर हे समीकरणच बनले आहे. कित्येक वर्षांपासून गावाला हक्काच पाणी देण्यात कोणलाच यश आले नाही. वाठार स्टेशनचा पाणीप्रश्न सोडवण्याचे काम विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नातून सुरू आहे. ही पाणी योजना प्रत्यक्षात सुरू झाली तर विकास दुप्पट वेगाने होईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे. सध्याच्या परिस्थितीतून ग्रामस्थांना शासनाने आधार देऊन गावच्या तरंगत्या लोकसंख्येनुसार पाणी उपलब्ध करून देण्याची भूमिका पार पाडावी व पाणी संकटातून ग्रामस्थांची सुटका करावी, अशीच मागणी होत आहेत.



वाठार स्टेशनमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. यासाठी नव्याने पाणी योजनेचे काम हाती घेतले आहे. वाठार स्टेशन लवकरच टॅकरमुक्त होईल.
- महेश लोंढे, सरपंच, वाठार स्टेशन

Web Title: Bread water needs to be taken in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.