कडी-कोयंडा तोडून पाच तोळ्यांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:36 AM2021-03-15T04:36:03+5:302021-03-15T04:36:03+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास शिंदे हे हजारमाची येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सेवा बजावत आहेत. सध्या ते कुटुंबासमवेत ओगलेवाडी येथे राहतात. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास शिंदे हे हजारमाची येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सेवा बजावत आहेत. सध्या ते कुटुंबासमवेत ओगलेवाडी येथे राहतात. त्यांचे वाघेरी या मूळ गावीही घर आहे. घराच्या वरच्या मजल्यावर त्यांची आई व भाऊ राहतात. विलास शिंदे हे शुक्रवारी वाघेरी येथे जाऊन घराची साफसफाई करून संध्याकाळी पुन्हा ओगलेवाडी येथे आले होते. येताना त्यांनी कपाट व घराला कुलूप घातले. मात्र रविवारी सकाळी घराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर विलास शिंदे यांनी वाघेरी येथे जाऊन पाहिले असता, अज्ञातांनी त्यांच्या घराच्या दाराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला असल्याचे व घरातील कपाटातील लॉकर उचकटून त्यातील पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने व अठरा हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम असा २ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले. याबाबतची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसात झाली आहे.
- चौकट
ओगलेवाडीत दोन घरे फोडली
दरम्यान, ओगलेवाडी येथील कल्याण चाळीच्या पाठीमागील बाजूची दोन बंद घरेही शनिवारी रात्री चोरट्यांनी फोडल्याचे उघडकीस आले आहे. मात्र याठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. ओगलेवाडी व वाघेरी येथे एकाच रात्री घडलेल्या चाेरीच्या प्रकारामुळे सदाशिवगड विभागातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.