कऱ्हाडात ‘वायफाय’ सेवेला अखेर ब्रेक
By admin | Published: January 18, 2016 10:45 PM2016-01-18T22:45:55+5:302016-01-18T23:38:59+5:30
जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती : पाच वर्षांतील सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला दुसरी चपराक
कऱ्हाड : कऱ्हाड शहरातील लोकांच्या सोयीसाठी पालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या वायफाय सुविधेच्या ठरावाला सुरुवातीपासूनच विरोध केला जात होता. वायफाय सेवा पुरविणाऱ्या कंपनीकडून जागेचे भाडे पालिकेला भरले जावे, तसेच वायफाय सेवेतून ग्राहकांना काही काळ मोफत सेवा दिली जावी, अशा अनेक मागण्या होत्या. मात्र, सेवेतील दराबाबत कसलीही माहिती न देता सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे याविरोधात पालिकेतील विरोधी आघाडीसह पक्षनेत्या स्मिता हुलवान यांनी विरोध दर्शविला तसेच शिवसेनेकडून प्रसंगी आंदोलनेही करण्यात आली. तरीही ठेकेदाराकडून काम सुरू ठेवले गेले असल्याने याबाबत लोकप्रतिनिधी व जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्याने जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी वायफायच्या कामास स्थगिती देऊन याची चौकशी करण्याचे आदेश दिले.इस्लामपूरनंतर कऱ्हाड शहरात वायफाय सेवा सुरू करण्यासाठी कंपनीकडून कऱ्हाड पालिकेला पहिल्यांदा आलेल्या प्रस्तावाला त्याकाळच्या सत्ताधाऱ्यांकडून मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार शहरात जलद गतीने वायफायसेवा उभारण्यासाठी कामे सुरू करण्यात आली. कामे सुरू असताना सेवेबाबत कंपनीकडून कोणत्याही स्वरूपाची ठोस माहिती दिली जात नसल्याने याबाबत विरोधी आघाडीकडून कामांना विरोध केला गेला. त्या वायफायला विरोध करण्यासाठी शिवसेनाही पुढे आली. त्यातून शेवटपर्यंत पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान यांनी या प्रकरणाचा पाठ पुरावा केला. तसेच या कामांची चौकशी करण्याबाबत शिवसेनेच्या वतीने पालिकेसमोर आंदोलनही करण्यात आले. त्यावेळी संबंधित वायफायच्या कामाची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने केली. यानंतर वायफाय सेवेचे काम बंद ठेवले जाईल, असे सर्वांना वाटू लागले. मात्र, त्यानंतरही हे काम कंपनीकडून सुरूच ठेवण्यात आले. मुख्याधिकारी यांनीही जोपर्यंत कामाबाबत संपूर्ण माहिती दिली जात नाही तोपर्यंत काम सुरू करू नये, अशा कंपनीच्या ठेकेदारास सूचनाही केल्या होत्या. मात्र, तरीही कंपनीकडून मुख्याधिकाऱ्यांना कोणताही खुलासा न देता काम सुरू ठेवले गेले. याबाबत अखेर ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेवक श्रीकांत मुळे व विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान यांच्यासह नागरिकांनी सुरू असलेले काम बंद पाडले.
वायफायसाठी रस्त्याकडेला करण्यात आलेल्या खोदकामामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याचा शहरातील वाहतुकीवरही परिणाम होत असल्यामुळे यातून योग्य मार्ग काढण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेच्या होत्या. त्यातून अखेर सुरू झालेल्या वायफाय योजनेला महिना पूर्ण होण्याआधीच जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
जनहिताविरोधी वायफायचा ठराव करण्यात आला. त्यामुळे जो काही पालिकेमध्ये गैरकारभार सुरू आहे. त्याला या निर्णयामुळे पायबंद बसला आहे. आता तरी इथून पुढे पालिकेत होणारे ठराव हे जनहितासाठी करण्यात यावेत, अशी आशा आहे. ज्यांना वाटते आमचाच फक्त अभ्यास आहे. त्यांना या निर्णयामुळे समजले असावे की, कोणाचा किती अभ्यास आहे.
- स्मिता हुलवान, विरोधी पक्षनेत्या, कऱ्हाड पालिका
पाच वर्षांत दुसरी स्थगिती
गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या दोन कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती देण्यात आली आहे. रस्ता दुभाजकावरील ठराव व आता वायफायची योजना या दोन्ही ठरावात सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. त्या दोन्ही मंजूर ठरावांना जिल्हाधिकाऱ्यांकडून पाच वर्षांत स्थगिती देण्यात आली आहे.