अतिक्रमणामुळे गुदमरतोय सातारा शहरातील रस्त्याचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 04:51 PM2017-10-30T16:51:25+5:302017-10-30T17:31:48+5:30
सातारा शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या राजवाडा मंगळवार तळे मार्गाचा श्वास अतिक्रमणांमुळे गुदमरत आहे. बंदी असतानाही या परिसरात वडाप वाहने बिनदिक्कत उभी असतात. तर नो हॉकर्स झोन असूनही निम्मे अधिक व्यापारी संध्याकाळी अक्षरश: रस्त्यावरच मंडई भरवत असल्याने येथे वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त होत आहेत.
सातारा ,दि. ३० : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या राजवाडा मंगळवार तळे मार्गाचा श्वास अतिक्रमणांमुळे गुदमरत आहे. वडाप वाहनांना बंदी असतानाही या परिसरात ही वाहने बिनदिक्कत उभी असतात. तर नो हॉकर्स झोन असूनही मंडईचे निम्मे अधिक व्यापारी संध्याकाळी माल मांडून अक्षरश: रस्त्यावरच मंडई भरवत असल्याने संध्याकाळच्यावेळी येथे वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त होत आहेत.
राजवाडा परिसारत बसस्थानकाबरोबरच प्रतापसिंह महाराज मंडई, नगर पालिका शाळा, राजवाडा चौपाटी आदी महत्त्वाची आणि कायम वर्दळीची ठिकाणं वसली आहेत. सकाळी सातपासून गजबजलेला हा परिसरात रात्री उशिरा शांत होतो, तोही अवघ्या काही तासांसाठीच.
वाहतुकीच्या मुख्य सोयींबरोबरच, शाळा, महाविद्यालय, दवाखाने, क्लब हाऊस, मंडई, वाचनालय आदी येथे वसली आहेत. त्यामुळे विविध वयोगटांतील आणि आर्थिक स्तरातील नागरिकांचा या रस्त्यावरून राबता असतो.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी नित्याची बाब बनली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिकेकडून मिळणारे अभय हेच या वाहतूक कोंडीचे गमक असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.