बियर शॉपीच्या परवान्यासाठी लाचेची मागणी, उत्पादन शुल्कचे तीन अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 03:43 PM2022-04-27T15:43:04+5:302022-04-27T15:47:54+5:30
लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा या अधिकाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना संशय आल्याने त्यांनी ठरलेली लाचेची रक्कम स्वीकारली नाही;
सातारा : बियर शॉपीच्या परवान्याचे प्रकरण वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी तब्बल तीन लाखांची मागणी करणारे उत्पादन शुल्कचे तीन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले. सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना तातडीने अटक करण्यात आली.
निरीक्षक सतीश विठ्ठलराव काळभोर (वय ५६), दुय्यम निरीक्षक दत्तात्रय विठोबा माकर ( ५६), जवान नितीन नामदेव इंदलकर (३६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणाची तक्रार करणारी व्यक्ती ४७ वर्षांची असून, त्यांना नवीन बियर शॉपी सुरू करायची होती. यासाठी ते साताऱ्यातील उत्पादन शुल्क कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांच्याकडे दत्तात्रय माकर आणि नितीन इंदलकर याने परवान्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी तब्बल तीन लाखांची मागणी केली. तर निरीक्षक सतीश काळभोर यांनी तक्रारदाराला लाच रक्कम मागणीस प्रेरणा दिली. हा सारा प्रकार १४ मार्च २०२२ रोजी घडला होता.
त्यानंतर संबंधित तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे रितसर लेखी तक्रार केली होती. दरम्यान, लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा या अधिकाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना संशय आल्याने त्यांनी ठरलेली लाचेची रक्कम स्वीकारली नाही; परंतु त्यांनी लाचेची मागणी केल्याचे लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले.
त्यामुळे उत्पादन शुल्कच्या दोन अधिकारी आणि एका जवानावर लाचेच्या मागणीचा सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तातडीने त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
आतापर्यंत सात लाचखोर सापडले..
आतापर्यंत केवळ महसूल आणि पोलीसच लाच घेण्यामध्ये अग्रेसर होते; पण आता या विभागांनाही मागे टाकत उत्पादन शुल्क विभाग पुढे जाऊ लागला आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल सात लाचखोर या विभागातील सापडले आहेत. वाईतील एक, फलटणमध्ये दोन तर कोरेगावमध्ये एक आणि साताऱ्यातील तीन जणांचा समावेश आहे.