सोळशी नदीवरील पूल अतिवृष्टीने वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:23 AM2021-07-24T04:23:00+5:302021-07-24T04:23:00+5:30
बामणोली : महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे गावच्या जवळील कुरोशी गावच्या हद्दीतील सोळशी नदीवरील जुना पूल वाहून गेल्याने तापोळा भाग व ...
बामणोली : महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे गावच्या जवळील कुरोशी गावच्या हद्दीतील सोळशी नदीवरील जुना पूल वाहून गेल्याने तापोळा भाग व कुरोशीच्या अलीकडील बामणोली भागाचा संपर्क तुटला आहे.
बामणोली डोंगर रांगाकडील कुरोशी, सौंदरी, देवसरे, आचली, येरणे, लाखवड, गोगवे, वारसोळी, रामेघर, वाकी या गावांतील लोकांना रस्ते मार्गाने तापोळा विभागातील सोनाट, खांबील, वेंगळे, वाघेरा, तापोळा या गावांकडे जाता येणार नाही. सोळशी नदीवर कुरोशी गावालगत हा पूल सुमारे साठ वर्षांपूर्वी बांधला होता. जुन्या दगडी बांधकाम असलेल्या या पुलाचा अर्धा भाग गुरुवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने आलेल्या पुरात वाहून गेला आहे.
त्यामुळे बामणोली भागाकडच्या कुरोशी गावापर्यंतच्या अनेक गावांचा रस्ते मार्गाने तापोळा भागाशी होणारा संपर्क तुटला आहे. दोन्ही विभागांतील लोकांना अलीकडे व पलीकडे जाण्यासाठी हा एकमेव पूल होता. तो वाहिल्याने दोन्ही विभागांचा संपर्क तुटला आहे. कुरोशी भागातील लोकांना बाजारपेठ असलेल्या तापोळा गावात जाण्यासाठी आता बोटीशिवाय पर्याय उरला नाही. परंतु सद्य:स्थितीत नदीच्या पाण्याचा प्रवाह एवढा मोठा आहे की, बोटीतून प्रवास करणे शक्यच नाही. चुकून असा प्रवास केल्यास अपघाताची शक्यता आहे.
(कोट)
हा पूल सोळशी नदीवर असल्याने असल्या मुसळधार पावसात याची दुरुस्ती करणे जवळपास शक्यच नसून पाऊस उघडून पाणी उन्हाळ्यात कमी झाल्यानंतर नवीन पूल बांधणे शक्य असल्याने दोन्ही विभागांचे दळणवळण पुढील सहा महिने तरी बंद राहण्याचा धोका आहे.
-सतीश शिंदे, कुरोशी, ता. महाबळेश्वर
फोटो कॅप्शन
२३बामणोली
कुरोशी, ता. महाबळेश्वर येथील सोळशी नदीवरील पूल वाहून गेला.