वांग नदीवरील पूल बनला धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:35 AM2021-04-14T04:35:37+5:302021-04-14T04:35:37+5:30
दरम्यान, या ठिकाणी नवीन पूल व्हावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. त्या मागणीची दखल ...
दरम्यान, या ठिकाणी नवीन पूल व्हावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन नवीन पुलाला मंजुरी मिळाली; पण काम अद्यापही सुरू झालेले नाही. कामाला मुहूर्त कधी मिळणार, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
मंद्रुळकोळेतील या पुलावरची वाहतूक धोकादायक बनली आहे. कमकुवत असलेल्या या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूल कमकुवत असल्याची माहिती असूनही त्यावरून अपघाताचा धोका पत्करून वाहनचालक वाहने घेऊन जात आहेत. रस्त्यावरून सुसाटपणे वाहने घेऊन येणाऱ्या चालकांना पुलाजवळ असलेल्या तीव्र उताराच्या ठिकाणी आल्यावर वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही की अपघात होतो. असे अपघात या ठिकाणी अनेक वेळा घडले आहेत. भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये, यासाठी पुलाचे काम तातडीने होणे गरजेचे आहे.
- चौकट
दोन कोटी मंजूर, मग काम का रखडले?
मंद्रुळकोळे येथील वांग नदीवर १९६५-६६ मध्ये या पुलाचे बांधकाम करण्यात आले असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. त्यानंतरच्या काळात या पुलाची डागडुजी करण्यात आली. मात्र या पुलावरून सतत अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने पूल कमकुवत झाला आहे. या ठिकाणी नवीन पुलाला २ कोटी मंजूर झाले असल्याचे दोन वर्षांपासून सांगितले जात आहे. मग पुलाचे काम का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- कोट
मंद्रुळकोळे येथील वांग नदीवरील पुलाचे भूमिपूजन दोन वर्षांपूर्वी झाले होते. मात्र, ते कशात अडकून पडले आहे, ते समजले नाही. हा पूल धोकादायक बनला आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधितांनी याची दखल घ्यावी.
- अमोल पाटील, सरपंच, मंद्रुळकोळे, ता. पाटण