वांग नदीवरील पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:42 AM2021-05-20T04:42:59+5:302021-05-20T04:42:59+5:30
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळे, आणेदरम्यान असलेल्या मार्गावरील वांग नदीवरील पूल गत दोन दिवसांपासून पाण्याखाली ...
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळे, आणेदरम्यान असलेल्या मार्गावरील वांग नदीवरील पूल गत दोन दिवसांपासून पाण्याखाली गेला आहे. परिणामी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. संबंधित पाटबंधारे विभागाने याची दखल घेऊन अडविण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या काही प्लेट्स काढून पाण्याची पातळी कमी करावी, अशी नागरिकांसह वाहनधारकांमधून मागणी होत आहे.
वांग-मराठवाडी प्रकल्पाखाली वांग नदीवर अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. वांग नदीवर पाटण तालुक्यातील ढेबेवाडी, मालदन, खळे, साईकडे, काढणे, तर कऱ्हाड तालुक्यातील अंबवडे, आणे आणि येणके येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. रब्बी हंगामातील पिकांसह बागायती शेतीसाठी या बंधाऱ्यात पाणी अडवले जाते. मराठवाडी प्रकल्पात यावर्षी मुबलक पाणीसाठा असल्याने वारंवार बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्यात आले होते. परिणामी वांग नदीकाठच्या गावांना पाणी टंचाईपासून मुक्तता मिळाली आहे. शेतीसाठी, जनावरांसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी ही भरपूर पाण्याची उपलब्धता झाली आहे. वांग नदीकाठचा शेतकरी सिंचनाच्याबाबतीत यावर्षी समाधान व्यक्त करत आहेत.
वेळोवेळी धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने वांग नदीचे पात्र भर उन्हाळ्यात पाण्याने दुथडी भरले होते. नुकत्याच पडलेल्या वादळी पावसाने ओढ्याला आलेल्या जोरदार पाण्याने नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. परिणामी अडविण्यात आलेल्या बंंधाऱ्यावरून एक ते दीड फुटाने पाणी वाहत असल्यामुळे पुलावरून पाणी वाहू लागले आहे. पुलावर एक फूट पाणी आल्याने दुचाकी बंद पडत आहेत. मात्र, उन्हाळ्यात पूल पाण्याखाली गेल्याचा नागरिकांनी पहिल्यांदाच अनुभव
आल्याने लहान मुलांसह मोठेही त्याचा आनंद घेत आहेत.
फोटो आहे...