भुर्इंज-मालदेववाडी रस्त्यावरील पुलाला पुन्हा भगदाड

By Admin | Published: August 29, 2016 12:02 AM2016-08-29T00:02:10+5:302016-08-29T00:02:10+5:30

ग्रामस्थांतून संताप : तात्पुरती मलमपट्टी ठरली कुचकामी

Bridges over Bhusianj-Maldevwadi road again | भुर्इंज-मालदेववाडी रस्त्यावरील पुलाला पुन्हा भगदाड

भुर्इंज-मालदेववाडी रस्त्यावरील पुलाला पुन्हा भगदाड

googlenewsNext

भुर्इंज : येथील भुर्इंज मालदेववाडी असलेल्या रस्त्यावरील पुलाला मध्यभागीच भगदाड पडले असून, पुलाच्या दर्जाचे अक्षरश: धिंडवडे निघाले आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वीच या पुलाला अशाच प्रकारचे भलेमोठे भगदाड पडले होते; मात्र संबंधितांनी फक्त मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली. ती गळून पडली असून, या सर्व प्रकाराबाबत परिसरात संताप व्यक्त होत आहे.
भुर्इंज मालदेववाडी या रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यावरील या पुलावरून सतत वर्दळ सुरू असते. सुमारे २५ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीवेळी या पुलाला भलेमोठे भगदाड पडले होते. त्यावेळी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन मुरुमाची मलमपट्टी करून तेव्हा पडलेले भगदाड मुजवण्यात आले; मात्र अवघ्या काही दिवसांतच पुन्हा एकदा या पुलावरच भलेमोठे भगदाड पडल्याने पूल किती दिवस तग धरणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकाच पुलाच्या दर्जाचे अवघ्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा धिंडवडे निघाले आहेत. असे असतानाही महाडनजीकच्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेवरून प्रशासनाने कोणताच धडा घेतला नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या ओढ्याला पाणीही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जनतेच्या मनात धास्ती आहे.
मुळातच या भगदाडामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून, तसे काही झाल्यानंतरच संबंधित विभागाला जाग येणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या गोष्टींकडे प्रशासनाचे पुरेशा गांभीर्याने नसलेले लक्ष जनतेचा रोष वाढवत आहे.
रात्रीच्या वेळी जर काही घडले तर मोठा अपघात होण्याची शक्यता असून, या पुलाची केवळ मलमपट्टी न करता मजबूत दुरुस्ती करावी, अशी मागणी आबासाहेब वीर पतसंस्थेचे सचिव संजय शिंदे, सुनील शिंदे, वैभव शिंदे, चंद्रकांत जाधवराव, अंकुश मोरे, श्रीपाद एरंडे यांनी केली आहे.
धोम परिसरातील दोन पूल वाहून जाऊन अनेक महिने होऊनही प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्याने त्या परिसरातील पन्नासहून अधिक मुलांना घरी बसून काढावे लागत आहे. त्यातच या पुलाला भगदाड पडल्याने संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bridges over Bhusianj-Maldevwadi road again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.