नव्या वर्षात पुलांच्या कामाची ‘उड्डाणे’!

By admin | Published: December 10, 2015 11:57 PM2015-12-10T23:57:51+5:302015-12-11T01:00:07+5:30

शेंद्रे ते शिरवळपर्यंत १२ पुलांना डेडलार्ईन : रखडलेल्या कामांना अखेर मुहूर्त; सेवारस्त्यांची कामेही युद्धपातळीवर सुरू

Bridges 'work' in the new year! | नव्या वर्षात पुलांच्या कामाची ‘उड्डाणे’!

नव्या वर्षात पुलांच्या कामाची ‘उड्डाणे’!

Next

प्रदीप यादव---सातारा -पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास कमी वेळेत आणि सुरक्षित व्हावा, यासाठी सहापदरीकरणाच्या कामाबरोबरच उड्डाणपुलांची कामेही सुरू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात शेंद्रे ते पारगावपर्यंतच्या टप्प्यात १२ उड्डाणपुलांचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. काही पुलांची कामे या ना त्या कारणाने रखडली आहेत. परंतु नवीन वर्षात रखडलेल्या सर्व पुलांची कामे सुरू होणार असून कामाची ‘डेडलाईन’ही निश्चित झालेली आहे, अशी माहिती ‘भूसंपादन’चे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाय) सहापदरीकरणाच्या कामाबरोबरच उड्डाणपुलांचे काम सुरू केल्याने एक ना धड भाराभर चिंध्या, अशी अवस्था सध्या पाहायला मिळत आहे. सर्वच ठिकाणची कामे अपूर्णावस्थेत असल्यामुळे आणि रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे महामार्ग नको, पायवाट परवडली, असे म्हणण्याची वेळ वाहनधारक व प्रवाशांवर आली आहे. कामाचे योग्य नियोजन नसल्यामुळे सर्वत्र बोजवारा उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, येणाऱ्या अडचणी मार्गी लावल्याने २०१६ या नवीन वर्षात बहुतांश कामे मार्गी लागणार आहेत.
सातारा जिल्ह्यात शेंद्रे ते खंडाळा-पारगाव या टप्प्यात एकूण १२ उड्डाणपुलांचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये शेंद्रे, शिवराज पेट्रोलपंप, वाडेफाटा, लिंब फाटा, आनेवाडी, उडतारे, पाचवड, भुर्इंज, जोशीविहीर, बोपेगाव, सुरूर-वेळे, पारगाव (भोर फाटा) आणि केसुर्डी फाटा याठिकाणी उड्डाण पूल उभारण्यात येणार आहेत.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून महामार्गावर उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. मात्र, अद्याप बहुतांशी कामे अपूर्णावस्थेत आहेत. वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने आणि महामार्ग ‘मृत्यूचा मार्ग’ बनल्याने स्थानिक नागरिकांसह प्रवासी, वाहनधारकांमधून संताप व्यक्त होत आहे. ‘न्हाय’च्या ढिसाळ नियोजनामुळे आजपर्यंत अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. येणाऱ्या नवीन वर्षांत तरी ‘न्हाय’ने कामाचे योग्य नियोजन करून एक-एक काम मार्गी लावावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


शिरवळ, खंडाळ्यातील सेवारस्त्यांचे रूंदीकरण
महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामामुळे रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शिरवळ आणि खंडाळा शहरातील सेवारस्त्यांचे रुंदीकरण करणार असून याचे काम जानेवारी २०१६ मध्ये सुरू करणार आहे. यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.


खंबाटकी घाटातील रस्त्याचेही रुंदीकरण
पुण्याहून सातारकडे येताना वाहनचालकांना खंबाटकीचा अवघड घाट चढून यावे लागते. घाटातील रस्ता अरुंद असल्यामुळे अनेकदा कंटेनर अडकून वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. घाटरस्ता अवघड असल्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. यावर तोडगा म्हणून महामार्ग प्राधिकरणाने खंबाटकी घाटातील रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. मार्च २०१६ पर्यंत तीन महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.


घाटातील मंदिराचा वाद मिटायला हवा
खंबाटकी घाटरस्त्याचे रुंदीकरण करताना घाटातील खामजाई देवीचे मंदिर इतरत्र हलवावे लागणार आहे. त्यासाठी या मंदिराचा वाद मिटणे गरजेचे आहे. रस्त्यापासून आतल्या बाजूस मंदिरासाठी मोठी जागा देण्याचे नियोजन झाले आहे. तसेच याठिकाणी पाण्याची सोयही केली जाणार आहे. मात्र, शिवसैनिकांचा मंदिर हलविण्यास विरोध आहे.

Web Title: Bridges 'work' in the new year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.