इतिहासाला झळाळी : पुण्यातील सोन्याची नाणी साताऱ्यातील संग्रहालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 11:54 AM2021-03-13T11:54:18+5:302021-03-13T12:00:40+5:30

Archaeological Survey of India satara-पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथे आढळलेली तब्बल २ हजार ३५७ ग्रॅम वजनाची सोन्याची २१६ नाणी पुणे पुरातत्व विभागाकडून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. आजवरच्या इतिहासात प्रथमच सोन्याची नाणी संग्रहालयाच्या खजिन्यात जमा झाली असून, पुरातत्वकडून या नाण्यांचे संवर्धन केले जाणार आहे.

Brightened by history: Gold coins from Pune in a museum in Satara | इतिहासाला झळाळी : पुण्यातील सोन्याची नाणी साताऱ्यातील संग्रहालयात

इतिहासाला झळाळी : पुण्यातील सोन्याची नाणी साताऱ्यातील संग्रहालयात

Next
ठळक मुद्देइतिहासाला झळाळी : पुण्यातील सोन्याची नाणी साताऱ्यातील संग्रहालयात मौल्यवान नाण्यांचे पुरातत्त्व विभाग करणार संवर्धन

सचिन काकडे

सातारा : पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथे आढळलेली तब्बल २ हजार ३५७ ग्रॅम वजनाची सोन्याची २१६ नाणी पुणे पुरातत्व विभागाकडून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. आजवरच्या इतिहासात प्रथमच सोन्याची नाणी संग्रहालयाच्या खजिन्यात जमा झाली असून, पुरातत्वकडून या नाण्यांचे संवर्धन केले जाणार आहे.

पुण्यातील पिंपरी-चिंचवडजवळील चिखली येथे काही महिन्यांपूर्वी घराचे बांधकाम सुरू होते. या बांधकामासाठी खोदकाम करत असताना तांब्याचा चरवीच्या आकाराचा मोठा गढवा (भांडे) सापडला होता. या गढव्यात सोन्याची तब्बल २१६ नाणी सापडली असून, त्यांचे वजन २ हजार ३५७ ग्रॅम इतके आहे. या नाण्यांच्या वाटपावरून सुरू झालेल्या वादावादीनंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने सर्व नाणी ताब्यात घेऊन ती पुरातत्वकडे हस्तांतरित केली.

ही नाणी सिराजउद्दीन मोहम्मद शहा बहादूर दुसरा याच्या काळातील व १८३५ ते १८८० या कालखंडातील असावीत, असा निष्कर्ष पुरातत्व विभागाने काढला आहे. पुणे, मुंबई व नजीकच्या शहरांत शासकीय वस्तुसंग्रहालय नसल्याने पुणे पुरातत्व विभागाकडून ही नाणी साताऱ्यातील संग्रहालयाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याकडे सोन्याची २१६ नाणी व तांब्याचा गडवा सुपूर्द केला. यावेळी संग्रहालयाचे कर्मचारी गणेश पवार, अजित पवार, कुमार पवार, विनोद मतकर, देवदान भांबळ आदी उपस्थित होते.

साठ वर्षांनंतर सुवर्णयोग

उत्खननात अथवा बांधकामावेळी आढळलेली काही नाणी संग्रहालयाच्या खजिन्यात यापूर्वी जमा करण्यात आली आहेत. दहा वर्षांपूर्वी कोयनेत तांब्याची ५०० नाणी आढळली होती तर गेल्याच वर्षी इंदापूर येथे चांदीची ७५ नाणी सापडली होती. ही नाणीही सातारा येथील संग्रहालयात जमा करण्यात आली आहेत. मात्र, सोन्याची नाणी इतक्या मोठ्या संख्येने संग्रहालयाकडे हस्तांतरित करण्याची ही गेल्या ५१ वर्षांतील पहिलीच वेळ आहे.

  • सोन्याची नाणी २१६
  • नाण्यांचे वजन २,३५७ ग्रॅम
  • तांब्याचा गडवा ५२६ ग्रॅम
  • नाण्यांचा कालखंड १८३५ ते १८८०


पुणे पुरातत्व विभागाकडून ही नाणी नुकतीच सातारा संग्रहालयाकडे हस्तांतरित करण्यात आली. ही नाणी पुरातन आणि मौल्यवान असून, त्यांचे संवर्धन केले जाईल. जुन्या संग्रहालयाची जागा वस्तूंसाठी अपुरी पडू लागल्याने हजेरी माळावर नवे संग्रहालय उभारले जात आहे. सध्या संग्रहालयाच्या इमारतीचा वापर कोरोना रुग्णांसाठी केला जात आहे. कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यानंतर हे संग्रहालय सातारकरांच्या सेवेत लवकरात लवकर दाखल होईल, अशी आशा आहे.
- प्रवीण शिंदे, अभिरक्षक
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

Web Title: Brightened by history: Gold coins from Pune in a museum in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.