साताऱ्यात भरदिवसा चोरी, चोरट्यांनी १४ तोळ्यांचे दागिने केले लंपास
By दत्ता यादव | Published: March 15, 2023 01:32 PM2023-03-15T13:32:15+5:302023-03-15T13:51:04+5:30
घरफोडीच्या घटनात वाढ
सातारा : येथील विसावा नाक्यावरील ‘ग्रीन व्हिला’ या बंगल्यामधून अज्ञात चोरट्यांनी १० तोळे वजनाची सोन्याची दोन बिस्किटे, साडेसात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच १ लाख २५ हजारांची रोकड असा सुमारे ८ लाख २५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना दि. १३ रोजी दिवसाढवळ्या घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डाॅ. सुषमा माने (वय ६८) यांचा विसावा नाक्यावर ग्रीन व्हिला या नावाचा बंगला आहे. दि. १३ रोजी सकाळी पावणेआठ ते रात्री नऊ या कालावधीत चोरट्याने बंगल्याच्या दरवाजाचे लाॅक तोडून घरात प्रवेश केला. घरातील तब्बल साडेचाैदा तोळ्यांचे दागिने आणि १ लाख २५ हजारांची रोकड चोरट्यांनी हातोहात लांबविली.
रात्री नऊ वाजता घरात चोरी झाल्याचे डाॅ. माने यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात याची तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे हे अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, सातारा शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घरफोडी होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी दिवसा आणि रात्री सुद्धा गस्त वाढवली आहे. बंद घरे हेरून चोरटे आपला डाव साधत आहेत.