पायी चालण्याची सवय मोडली; नको त्या वयात गुडघा-कंबरदुखी लागली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:45 AM2021-09-24T04:45:45+5:302021-09-24T04:45:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सध्या विविध कारणांमुळे अनेकांची चालायची सवय मोडली आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. कोणत्याही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सध्या विविध कारणांमुळे अनेकांची चालायची सवय मोडली आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. कोणत्याही कारणासाठी गाडी वापरण्याची सवय अनेकांना आजार देऊ लागली आहे. त्यामुळे कमी वयात गुडघा आणि कंबरदुखीचा त्रास महिलांसह पुरुषांनाही होऊ लागला आहे. हा त्रास कमी करायचा असेल, तर नियमित चाला, असा सल्ला वैद्यकीयतज्ज्ञ देत आहेत.
हल्ली प्रत्येक घरात एक दुचाकी आणि चारचाकी आहे. मंडईत जाणे असो की किराणा आणणं असो, छोटी गाडी काढली की झालं, ही कुटुंबाची मानसिकता आहे. पायी भाजी आणायला जाणाऱ्यांची संख्याही बोटावर मोजण्याइतकीच आहे. अपार्टमेंटमध्ये वरच्या मजल्यावर राहायला असणारे सामानाची यादी दुकानदाराला दिल्यानंतर तो माल पिशवी सोडून घेतात. शारीरिक कष्ट करण्याचा आळस हे ही सवय मोडण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे बाकीच्या शारीरिक व्याधी दिवसेंदिवस वाढत आहेत.
चालण्याचा सराव संपुष्टात आल्याने चढाने किती ताकद वापरावी, उताराने किती ऊर्जा वाचवावी, याची गोळाबेरीज करण्याचा सराव चिमुकल्यांना नाही. त्यामुळे ते चढण, उतरण आणि सपाटीवर एकाच ताकदीने चालतात. त्यामुळे थोडे चालणे झाले तरीही त्यांना दम लागतो आणि घरातले मोठे त्यांची काळजी म्हणून चालण्याचे बारकावे शिकविण्यापेक्षा गाडीचा आधार घ्यायला भाग पाडतात.
१) या कारणांसाठीच होतेय चालणे
ज्येष्ठ - व्यायाम म्हणून सकाळ आणि संध्याकाळ
महिला - किराणा दुकानापर्यंत किंवा रिक्षा मिळेपर्यंत
पुरुष - गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत आणि केली तर शतपावली
तरुणाई - गल्लीतील मित्र-मैत्रिणीच्या घरापर्यंत
२) म्हणून वाढले हाडांचे आजार
नियमित चालण्याची सवय असलेल्या व्यक्तींच्या शरीराची संपूर्ण हालचाल होते. त्यामुळे त्यांना कुठलंही दुखणं उद्भवत नाही. चालणं कमी असल्याने वजन वाढते, त्याबरोबरच कंबर, पाठ आणि गुडघे दुखण्याचाही त्रास होतो. मधुमेह वाढण्याचाही धोका कमी चालण्याने उद्भवतो. वारंवार गाडीचा वापर केल्याने गुडघे, कंबर आणि पाठ यांचे दुखणे बळावते.
- डॉ. शरद जगताप, अस्थिरोगतज्ज्ञ, सातारा
३) हे करून पाहा
एक किलोमीटर परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळा
कुठलेही काम करताना सहकाऱ्याची मदत कमीत कमी घ्या
घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर टाळा
४. यासाठी तरी मुलांना पायी चालवा
रस्त्याने चालत जाताना शारीरिक हालचाल होते. त्याबरोबरच चालत फिरण्याने परिसराची ओळख, महत्त्वपूर्ण खुणा लक्षात राहतात. दुसरं म्हणजे ज्या भागात आपण राहतो तो परिसर, त्यातील गल्लीबोळ माहीत असतील, तर एखाद्या बाका प्रसंगाला सामोरे जाताना फार अडचण होत नाही. कित्येकदा गल्ली शेजारी असणारी महत्त्वाची दुकाने, ठिकाणे याची माहिती नसल्याने मुलांना एकटे फिरतानाही आपले घर शोधणे अवघड होते. पायी फिरताना मुलांना ठळक खुणा आणि परिसराची माहिती होते.