कासजवळ वृक्ष तोडून झोडतायेत पार्ट्या !
By admin | Published: June 14, 2015 11:49 PM2015-06-14T23:49:24+5:302015-06-14T23:56:39+5:30
लक्ष ठेवण्याची प्रवीण पाटील यांची मागणी
सातारा : सध्या कास तलाव पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत असून, काही अतिउत्साही पर्यटकांकडून कासचे विद्रूपीकरण करण्याचे काम सुरू आहे. तसेच काहीजण तेथील वृक्षांची कत्तल करून पार्ट्या करत आहेत, कासचे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसराची निगराणी करण्यात यावी, अशी मागणी स्वीकृत नगरसेवक प्रवीण पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कास तलाव व परिसर हे पर्यटकांचे आकर्षण आहे. सुटीच्या दिवसात याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. फिरायला आल्यानंतर पर्यटकांकडून परिसरात अस्वच्छता होतो. या ठिकाणी परगावचे तसेच सातारा परिसरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. काही पर्यटक चुली पेटवून या ठिकाणी स्वयंपाक करतात. यासाठी त्याच परिसरामध्ये वृक्षतोड करतात. त्यामुळे कासचे निसर्गसौंदर्य धोक्यात येत आहे. पर्यटकांच्या सततच्या राबत्यामुळे मद्याच्या बाटल्या, कोल्ड्रिंक्स, प्लास्टिकच्या बाटल्या, पत्रावळ्या, द्रोण आदींचा त्या ठिकाणी खच पडला आहे. कास परिसरात स्वच्छता करण्यासाठी कोणीही नाही. त्यामुळे या परिसराची स्वच्छता करण्यात यावी, तसेच निगराणीसाठी पालिकेने खर्च करावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)