राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 05:32 AM2024-10-12T05:32:54+5:302024-10-12T05:34:03+5:30
आपण संजीवराजेंच्या पाठीशी ठाम उभा राहणार असून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असे रामराजे यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, फलटण (जि. सातारा) : निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच फलटणमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या असून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि संपूर्ण राजे गट हे दि. १४ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटामध्ये प्रवेश करीत हाती तुतारी घेणार आहेत.
आमदार रामराजे नाईक निंबाळकर सध्या तरी शांत राहणार असले तरी महायुतीचा प्रचार ते करणार नाहीत. गेले अनेक दिवस रामराजे व आमदार दीपक चव्हाण हे खासदार शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आपण संजीवराजेंच्या पाठीशी ठाम उभा राहणार असून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असे रामराजे यांनी स्पष्ट केले. रामराजे हे विधानपरिषदेचे आमदार असून आणखी कार्यकाळ बाकी आहे. या तांत्रिक अडचण असल्याने ते तूर्त प्रवेश करणार नाहीत.