धर्माच्या पलिकडे भाऊ-बहिणीचं नातं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:41 AM2021-08-22T04:41:03+5:302021-08-22T04:41:03+5:30
भाऊ आणि बहिणीचं नातं अत्यंत पवित्र मानलं जातं. इतिहासाची पानं उलगडली तरी जात, पात, धर्म, पंथ याच्या पलिकडे हे ...
भाऊ आणि बहिणीचं नातं अत्यंत पवित्र मानलं जातं. इतिहासाची पानं उलगडली तरी जात, पात, धर्म, पंथ याच्या पलिकडे हे नातं प्राणपणानं जपलं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बादशहा हुमायून अन् चित्तौडची महाराणी कर्णवती या भावा - बहिणीचं नातं इतिहासात कोरलं गेलंय... आजच्या २१ व्या शतकातही हिंदू-मुस्लिम भाऊ-बहिणी हे नातं तेवढ्याचं निरागस प्रेमानं जपताना पाहायला मिळतात.
साताऱ्यातील प्रसिध्द क्रिकेटपटू इर्शाद बागवान यांना माजी नगरसेविका सुवर्णाताई पाटील या अनेक वर्षांपासून राखी बांधतात. ज्या आपुलकीनं सख्ख्या भावाला त्या ओवाळतात, त्याच आपलेपणानं सुवर्णाताईंनी इर्शाद भाईंनाही भावाचा मान दिला आहे. गायत्री गावडा, संदेशा सणस या कॉलेज काळातील मैत्रिणी जवळपास ३० वर्षांपासून त्यांना राखी बांधतात. इर्शाद बागवान यांच्या धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयातील या मैत्रिणी. अनेकजणी लांबच्या गावावरुन साताऱ्यात शिकायला यायच्या. लांबून येणाऱ्या या मैत्रिणींवर कुठले संकट आले तरी सोडविण्यासाठी भावाच्या नात्यानं इर्शाद उभे राहत होते. तोच मायेचा धागा या बहिणींनी अजूनही पकडून ठेवला आहे. कोरोनामुळे एकमेकांकडं जाणं-येणं कमी झालं असलं तरी मोबाईलवरुन रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत एकमेकांची खुशाली विचारली जाते.
गेल्या २५ वर्षांपासून विमा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले सातारा तालुक्यातील सोनगाव येथील जुबेर शेख यांना कला व वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेत असताना कामिनी इथापे, जना सणस, सुनीता मोरे, विजया कदम या मैत्रिणी राखी बांधत. आजही त्यांचं हे नातं कायम टिकून आहे. ३० वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला असला तरीही रक्षाबंधन अन् भाऊबीज म्हटलं की हे भाऊ - बहीण एकत्र येतात. जुबेर यांचा जवळचा मित्र दुर्दैवाने मृत्यूमुखी पडला. मात्र, त्याच्या बहिणीला भावाची कमी जाणवू नये, यासाठी जुबेर सातत्याने तिच्या मदतीला धावून जात असतात.
नातं जपा रे...!
रक्षाबंधन, भाऊबीज या दोन सणांमुळे तरी आज भावा-बहिणीच्या नात्याविषयी आठवण राहते. भौतिक सुखाच्या मागे आपण सारेच लागलोय. प्रगतीच्या या वेगवान प्रवाहात अनेक आपली माणसं मागे राहतात. बहिणींना आर्थिक परिस्थितीमुळे अनेक तणावांना सामोरे जावे लागते. या परिस्थितीत नातं जपावं, बहिणीला थोडी मदत करावी. आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो, तेव्हा अनेकदा वेटरला सहज टिप देतो. मग गरीब बहिणीलाही का मदत करु नये... अशी भावना इर्शाद बागवान यांनी व्यक्त केली.
सागर गुजर
फोटो : २१ राखी