गळा चिरून विवाहितेचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:42 AM2021-09-26T04:42:37+5:302021-09-26T04:42:37+5:30
उज्ज्वला रघुनाथ ठाणेकर (सध्या रा. वाखाण रोड, कऱ्हाड, मूळ रा. पेठ वडगाव, जि. कोल्हापूर), असे खून झालेल्या महिलेचे नाव ...
उज्ज्वला रघुनाथ ठाणेकर (सध्या रा. वाखाण रोड, कऱ्हाड, मूळ रा. पेठ वडगाव, जि. कोल्हापूर), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सचिन बाळू निगडे (रा. मळाईनगर, मलकापूर, ता. कऱ्हाड) यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली असून, अज्ञातावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील उज्ज्वला ठाणेकर ही विवाहिता कौटुंबिक कारणास्तव पतीसोबत राहत नव्हती. गत दोन वर्षांपासून कऱ्हाडात वाखाण रस्त्यालगत पाणीपुरवठा संस्थेसमोर भाडेतत्त्वावर खोली घेऊन ती एकटीच त्याठिकाणी राहत होती. तिची दोन मुले शिक्षणासाठी वसतिगृहात वास्तव्यास आहेत. उज्ज्वलाच्या बहिणीचे पती सचिन निगडे यांचे उज्ज्वलाच्या घरी येणे-जाणे होते. शुक्रवारी, दि. २४ रोजी उज्ज्वलाने सचिन यांना फोन केला होता. मैत्रिणीसह कोरोना लस घ्यायला जाणार असल्याचे तिने सांगितले होते. मात्र, त्यानंतर तिचा संपर्क झाला नाही. शनिवारी सकाळी सचिन उज्ज्वलाच्या घरी गेले असता घराला बाहेरून कुलूप असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर उज्ज्वला ज्या मैत्रिणीसमवेत लस घ्यायला जाणार होती त्या मैत्रिणीच्या घरी जाऊन सचिन यांनी विचारपूस केली, त्यावेळी शुक्रवारी दुपारी तीन वाजता दोघीही लस घेऊन आल्यानंतर आपापल्या घरी गेल्याचे त्या मैत्रिणीने सचिन यांना सांगितले.
सचिन यांनी मैत्रिणीला सोबत घेऊन पुन्हा तिचा शोध सुरू केला. दोघेही पुन्हा उज्ज्वलाच्या घराकडे आले. घराच्या खिडकीतून त्यांनी आत पाहिले असता उज्ज्वला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले. नागरिकांच्या मदतीने दगडाने कुलूप तोडून सचिन यांनी घरात प्रवेश केला असता उज्ज्वलाचा खून झाल्याचे समोर आले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे यांना सचिन निगडे यांनी माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. घटनास्थळावरील परिस्थितीवरून चौकशी सुरू केली. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांत अज्ञातावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
- चौकट
आरोपी अज्ञात, कारणही अस्पष्ट!
कऱ्हाड शहर परिसरात गत काही दिवसांपासून खुनाचे सत्र कायम आहे. यापूर्वी वारुंजी फाटा येथे दुहेरी खुनाची घटना घडली होती. एका मातेने आपल्या दोन्ही मुलांचा खून करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटनाही घडली होती. या घटनेनंतर पुन्हा एकदा वाखाणात खुनाची घटना घडली असून, उज्ज्वला यांच्या खुनाचे कारण अस्पष्ट आहे. हल्लेखोरही अज्ञात आहे. पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला आहे.
फोटो : २५केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाडातील वाखाण रस्त्यालगत खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी भेट देऊन तपास सुरू केला.
फोटो : २५उज्ज्वला ठाणेकर
कॅप्शन : मृत उज्ज्वला ठाणेकर