‘बीएसएफ’ला हवी ‘वन रँक वन पेन्शन’
By Admin | Published: September 15, 2015 11:46 PM2015-09-15T23:46:02+5:302015-09-15T23:55:24+5:30
साताऱ्यात मोर्चा : लष्कराप्रमाणेच सर्व सेवाशर्ती लागू करण्याची मागणी
सातारा : ‘वन रँक वन पेन्शन’च्या निर्णयाचा लाभ सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) निवृत्त जवानांना मिळावा, या आणि इतर मागण्यांसाठी निवृत्त जवानांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. लष्कराप्रमाणेच सर्व सेवाशर्ती ‘बीएसएफ’ला लागू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
सेवा व पेन्शनचे सर्व नियम भारतीय स्थलसेनेप्रमाणे लागू करावेत, ‘वन रँक वन पेन्शन’ योजना लागू करावी, जवानांना मोफत आरोग्य सुविधा पुरवाव्यात, लष्कराप्रमाणे माजी सैनिकाचा दर्जा प्राप्त करून द्यावा, प्रत्येक जिल्ह्यात ‘बीएसएफ’ माजी सैनिक कल्याण मंडळ स्थापन करावे आणि त्यांना संपूर्ण अधिकार द्यावेत, ही मंडळे वैधानिक संस्था म्हणून अस्तित्वात आणावीत, स्थलसेनेप्रमाणेच ‘बीएसएफ’ जवानांसाठी स्वतंत्र कॅन्टीनची व्यवस्था करावी, ‘बीएसएफ अॅक्ट’च्या कलम १९ प्रमाणे दहा वर्षे सेवा करून निवृत्त झालेल्या जवानांचे थांबविलेले निवृत्तिवेतन पुन्हा सुरू करावे, कॉन्ट्रिब्यूटरी पेन्शन प्रथेतून ‘बीएसएफ’ जवानांना सूट मिळावी, शहिदाच्या कुटुंबीयांना राज्य सरकारची नोकरी मिळावी, मुलांना प्रत्येक स्तरावर मोफत शिक्षण मिळावे, ‘बीएसएफ’ जवानाच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसाह्य मिळावे, निवृत्त अपंग व वृद्ध जवानांना उद्योगधंद्यांसाठी अर्थसाह्य मिळावे, निवृत्त जवानांना शेतजमीव व घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अशा
मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
सरकारकडून न्याय मिळावा...
‘बीएसएफ’ जवान या सर्व सुविधा मिळण्यास पात्र असून, सरकारने न मागताच त्या देणे गरजेचे होते. अशा सुविधा मिळत नसतील, तर यापुढे ‘बीएसएफ’मध्ये जाण्यास कोणीही धजावणार नाही. ‘बीएसएफ’ जवान शहीद झाल्यावर त्याला मानवंदना दिली जाते; मात्र नंतर त्याच्या पत्नीला सरकारदफ्तरी हेलपाटे मारावे लागतात. सीमा सुरक्षा दल नसते तर सीमेवरील तस्करी, भ्रष्टाचार, दहशतवादी हल्ले, बेकायदा कृत्ये कितीतरी वाढली असती. अशा जवानांना सरकारकडून न्याय मिळावा आणि त्यासाठी आंंदोलने, मोर्चा, सत्याग्रह असे मार्ग वापरावे लागू नयेत, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.