साताऱ्याजवळ मालवाहू रेल्वेखाली आल्या म्हशी, एक म्हैस ठार; मृत म्हैशीला जेसीबीने काढले बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 04:27 PM2022-02-05T16:27:25+5:302022-02-05T16:46:17+5:30
या म्हशी कोणाच्या होत्या. याचा आता रेल्वे पोलिस शोध घेत आहेत
सातारा: सातारा शहराजवळील संगम माऊली रेल्वे स्टेशन येथे मालवाहू रेल्वेने दिलेल्या धडकेत एक म्हैस जागीच ठार झाली. तर एक म्हैस गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, पुण्याहून कोल्हापूरकडे जाणारी मालवाहू रेल्वे संगम माहुली जवळ आल्यानंतर रेल्वे रुळावर दोन म्हशी चालत होत्या. त्यावेळी चालकाने बराच वेळ हॉर्न वाजवला. मात्र तरीसुद्धा म्हशी रुळावरून बाजूला झाल्या नाहीत. परिणामी मालवाहू रेल्वेची जोरदार धडक या दोन्ही म्हशींना बसल्याने एक म्हैस जागीच गतप्राण झाली. तर एक म्हैस गंभीर जखमी झाली.
दोन्ही म्हैशी रेल्वेच्या खाली अडकल्या गेल्या. या अपघातानंतर रेल्वे थांबवली. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जेसीबी मागवला. या जेसीबीच्या साह्याने रेल्वेखाली अडकलेली मृत म्हैस बाहेर काढली. त्यानंतर मालवाहू रेल्वे कोल्हापूरकडे रवाना झाली. या म्हशी कोणाच्या होत्या. याचा आता रेल्वे पोलिस शोध घेत आहेत.