बाबासाहेब आंबेडकरांचे सांस्कृतिक भवन उभारावे : भारिपची मागणी
By admin | Published: July 1, 2017 01:00 PM2017-07-01T13:00:13+5:302017-07-01T13:00:13+5:30
वाई पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन
आॅनलाईन लोकमत
वाई , दि. 0१ : शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे, स्मारकासाठी पंचायत समितीच्या सोनगीरवाडीतील पशुवैद्यकीय रुग्णालयाची जागा आरक्षिक करण्यात यावी या मागणीसाठी भारिप बहुजन संघाच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
भारिपच्या वतीने सभापती रजनी भोसले, उपसभापती अनिल जगताप व गटविकास अधिकारी अशोक भवारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वाई शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक असावे, सांस्कृतिक भवन असावे अशी तमाम आंबेडकर जनतेची मागणी आहे. अनेक वर्षांपासूनचे हे स्वप्न अपूर्णच आहे. ते साकार करण्यासाठी सोनगीरवाडी मध्ये सर्वे नंबर-२अ मध्ये बारा गुंठे जागा असून या जागेत पशुवैद्यकीय दवाखाना आहे. हा दवाखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. त्यातील चार गुंठे जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांस्कृतिक भवनासाठी आरक्षित करण्यात यावी व त्या ठिकाणी भव्य सांस्कृतिक भवन उभे करण्यात यावे अशी मागणी आंबेडकर अनुयायी करीत आहेत. तरी आमच्या मागणीचा त्वरित विचार होवून मान्य करावी अन्यथा वाई तालुक्यातील तमाम आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत, असाही इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, तालुकाध्यक्ष सुरज गायकवाड, सदस्य उर्मिला परिहार, भानुदास आगेडकर, पोपट यादव, आकाश भोसले, अजय घाडगे, अनिल चव्हाण, मिलन गायकवाड, हिंदुराव सावंत, प्रमोद गायकवाड, दीपक बडेकर, करण साठे, अविनाश शेलार, ऋषिकेश शेलार, सचिन गायकवाड, गणेश भोसले, विनोद चौधरी, दीपक किरवे, सनी ढगे, चेतन तुषार, बाबा आवाडे, अभिजित कांबळे, किरण अडसूळ यांच्यासह शेकडो सदस्यांच्या सह्या आहेत.