वास्तव्य नसल्याने इमारती मोडकळीस! रावसाहेब थोडं इकडंही बघा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती पडून व त्यांचा गैरकारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:17 AM2018-01-19T00:17:40+5:302018-01-19T00:17:49+5:30
वडूज : तहसील कार्यालय व पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीसह महसूल कर्मचारी कॉलनीत कोणी कर्मचारी वास्तव्यास नसल्याने इमारतींचा सर्रास गैरवापर होत आहे
वडूज : तहसील कार्यालय व पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीसह महसूल कर्मचारी कॉलनीत कोणी कर्मचारी वास्तव्यास नसल्याने इमारतींचा सर्रास गैरवापर होत आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग आणि पोलिस खाते यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च करून तहसील कार्यालय आणि पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस इमारती उभ्या केल्या आहेत. या इमारतीत सध्या कोणीही वास्तव्यास नसल्याने या इमारतीचा गैरवापर होण्यास सुरुवात झाली आहे. या इमारतीचे काम अर्धवट राहिल्याने शासनाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या इमारती शेजारीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच महसूल विभाग असूनही या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का?, असा संतप्त सवाल नागरिकांतून होत आहे.
या परिसरात भूमीअभिलेख कार्यालय, तहसीलदार व महसूल कर्मचारी निवासस्थान आहे. मात्र सध्या या ठिकाणी कोणीही वास्तव्यास नसल्याने ‘भलतेच चाळे’ करणारे या इमारतीचा खुलेआम वापर करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. येथून रोज हजारो नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांची ये-जा असते. या इमारतीत गैर कारभाराची कृत्ये पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर याचे वाईट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवसाढवळ्या होत असलेल्या दृश्याकडे पाहण्याचा कल सध्या वाढू लागला आहे .
संबंधित विभागाकडे वेळोवेळी या इमारती संदर्भात चौकशी केली असता हे अपूर्ण बांधकाम ठेकेदाराच्या व संबंधित विभागाच्या ‘साटेलोटे’ धोरणामुळे रखडले असल्याचे प्रकर्षाने जाणवते. यावर तोडगा म्हणून संबंधित विभागाने गांधारीची भूमिका न घेता तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रशासनाने ही इमारत स्वच्छ केली होती.
मात्र, बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. इमारतीच्या चारी बाजूस काटेरी झाडाझुडपांची वाढ झाल्याने इमारत झाडांनी पूर्णपणे झाकली गेली आहे. याचा फायदा प्रेमीयुगुल घेत आहेत. या इमारतीचे बांधकाम झाल्यापासून त्या तशाच पडून आहेत. त्यामुळे या इमारतीची देखभाल होत नाही.
इमारतीपासून पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर असतानाही या इमारतीमध्ये धाडसाने गैरकारभार होत आहेत. येथे सुरू असणाºया अवैध उद्योगांविषयी संबंधिताना व पोलिस विभागाला माहिती नसणं ही शोकांतिका म्हणावी लागेल. बंद घरे यामुळे इमारतीचा गैरवापर तर होत आहेच; परंतु या परिसरात एकदिवस मोठा अनर्थ झाल्यावरच संबंधितांचे डोळे उघडणार का ? असा संतप्त सवाल नागरिकांनी ‘लोकमत’कडे याविषयी बोलताना स्पष्टपणे व्यक्त केला आहे.
वास्तव्य नसल्याने गैरकृत्यांना प्रोत्साहन
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शासकीय इमारती वापराविना पडून राहिल्याने अवैध व्यवसायांना आणि कामांना प्रोत्साहन मिळत आहे. तर या इमारतीत गैरकृत्याचे साहित्य मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अर्धा एकरापेक्षा जादा जागा मध्यवर्ती ठिकाणी शासनाला मिळून देखील त्याचा सुयोग्य वापर करता येत नसल्याने तालुक्यातील नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.