बैल थांबले...श्वान धावले!

By admin | Published: January 13, 2016 12:11 AM2016-01-13T00:11:53+5:302016-01-13T01:09:08+5:30

स्थगितीपूर्वी धावल्या गाड्या : पुसेगावच्या सेवागिरी यात्रेत श्वान स्पर्धेसाठी गर्दी

The bull stopped ... the dog ran! | बैल थांबले...श्वान धावले!

बैल थांबले...श्वान धावले!

Next

पुसेगाव : पुसेगावच्या सेवागिरी यात्रेत यंदाही कमालच झाली. दरवर्षी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या बैलगाड्यांच्या शर्यतींना बंदी असल्याने त्या रद्द केल्या होत्या. यात्रा सुरू असतानाच केंद्र सरकारने गुरुवार, दि. ५ रोजी बैलगाड्यांच्या शर्यतींवरील बंदी उठवली. देवस्थानने तत्काळ हालचाली करून शर्यती आयोजित केल्या. सोमवारी शर्यती निर्विघ्नपणे पार पडल्याही अन् मंगळवारी उच्च न्यायालयाने केंद्राच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे बैलं थांबले; पण श्वान धावली.
श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त पुसेगाव, ता. खटाव येथे आयोजित केलेल्या श्वान शर्यतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बैलगाड्यांच्या शर्यतींना न्यायालयीन बंदी असल्याने या श्वानांच्या चित्तथरारक शर्यती पाहण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे १० हजार श्वानप्रेमींनी हजेरी लावली होती. पुसेगाव-दहिवडी रस्त्यालगत कटगुण माळावर झालेल्या या स्पर्धेत सातारा, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली या जिल्ह्यांतून महाराष्ट्र ग्रेहाउंड गट, ग्रेहाउंड गटात, कारवान, ओरिजनल, क्रॉस आदी प्रकारच्या श्वानांनी सहभाग घेतला. स्पर्धा बाद पद्धतीने खेळवण्यात आल्या.
प्रारंभी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्ट अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, शिवाजीराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, विजय जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. श्वान शर्यतीचे समालोचन खास शैलीत झाल्याने रंगत आली. प्रत्येक फेरीत धावणाऱ्या श्वानांची वंशावळ व त्यांनी आत्तापर्यंत मारलेल्या मैदानांचा इतिहास श्वानप्रेमींच्या पुढे उलगडल्याने शर्यतीत खरी रंगत आली. यावर्षी स्पर्धेत श्वानांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविल्यामुळे अंतिम फेरीपर्यंत सूर्यास्त झाला होता.
दोन वर्षांपूर्वीही काही काळासाठी बैलगाड्यांच्या शर्यतीवरील बंदी मागे घेण्यात आली. यात्रा झाल्यानंतर पुन्हा बंदी आणण्यात आली होती. बैलगाड्यांच्या शर्यती पार पडल्या त्यानंतर पुन्हा मंगळवारी बंदी आली. या योगायोगाची चर्चा रंगत होती. (प्रतिनिधी)

शौकिनांकडून संमिश्र प्रतिक्रिया


केंद्र सरकारने शर्यत सुरू होण्यासाठी निर्णय घेतला होता. न्यायालयाने त्याला स्थगिती दिली असली तरी सरकार आमच्या बाजूने असल्याने ते योग्य बाजू मांडतील.
- धनाजी शिंदे, अध्यक्ष,
अखिल भारतीय बैलगाडी चालक-मालक संघटना


बैलगाड्या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सद्याच्या निर्णयाचा आदर राखत आम्ही न्यायालयात जाण्याची तयारी करत आहोत.
- सचिन नलवडे, तालुकाध्यक्ष,
कऱ्हाड उत्तर स्वाभिमानी शेतकरी संघटना


केंद्र सरकारने न्यायालयाचे मत जाणून घेऊन बैलगाडी शर्यतींसंदर्भात निर्णय घेतला असता तर बरे झाले असते. स्थगितीमुळे बैलगाडी चालक-मालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
- अमोल शिंदे, अ‍ॅनिमल आॅफिसर,
मुंबई उच्च न्यायालय

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. त्यामुळे आम्हाला चिंता नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून रास्त मार्गाने न्याय मिळेल, यावर आमचा विश्वास आहे. बैलगाडी शर्यतींना परवानगी मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
- आनंदराव मोहिते, बैलगाडी मालक, रेठरे बुद्रक

Web Title: The bull stopped ... the dog ran!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.