जोरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:48 AM2021-02-20T05:48:48+5:302021-02-20T05:48:48+5:30
वाई : धनगरवस्ती, जोर, ता. वाई येथील गणेश पाकू ढेबे यांच्या बैलावर मंगळवारी (दि. १६) सायंकाळी साडेसातच्या ...
वाई : धनगरवस्ती, जोर, ता. वाई येथील गणेश पाकू ढेबे यांच्या बैलावर मंगळवारी (दि. १६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास बिबट्याने झडप घालून ठार मारले. गणेश ढेबे यांचे अंदाजे चाळीस हजारांचे नुकसान झाल्याची तक्रार जोर गावाचे पोलीसपाटील यांनी वनविभागात दिली आहे.
वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, धनगरवस्ती, जोर हा वाईच्या पश्चिम भागातील दुर्गम भाग असून, या परिसरात घनदाट जंगल आहे. या जंगलात अनेक रानटी हिंस्र प्राणी आहेत. या भागात बिबट्याचाही वावर असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले आहे. बांधलेल्या बैलावर बिबट्याने हल्ला केल्याने कोणालाही कळायच्या आतमध्ये बिबट्याने आपला डाव साधून बैलाचा जीव घेतला. ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने जंगलात धूम ठोकली. परंतु गरीब शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाकडून संबंधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई म्हणून चाळीस हजार देण्यात येणार आहे, असे वनविभागाचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी सांगितले आहे.
चौकट :-
वनविभागाकडून त्वरित नुकसानभरपाई देणार आहे. जांभळीपासून त्या परिसरातील जंगली भागात बिबट्यासह काही जंगली हिंस्र प्राण्यांचे वास्तव्य आहे. तरी परिसरातील नागरिकांनी आपल्या पाळीव जनावरांसह स्वतःचे रक्षण करावे, त्यातूनही नुकसान झाल्यास वनविभाग शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. त्वरित शासनाच्या नियमाप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात येईल. वाईच्या वनविभागात तशी नोंद करण्यात यावी.
- महेश झांजुर्णे,
वनक्षेत्रपाल, वनविभाग, वाई