पुसेगावात बैलगाडी शर्यतीचा उडाला धुरळा, शौकिनांमुळे डोंगरही भरला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 02:09 PM2022-02-23T14:09:17+5:302022-02-23T14:10:28+5:30
गेल्या दोन-चार वर्षांपासून पुसेगावात बैलगाड्यांच्या शर्यती झाल्या नव्हत्या. त्यामुळे प्रेक्षकांनी आजच्या आखाड्याला प्रचंड गर्दी केली होती
पुसेगाव : महाराष्ट्रासह इतर राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुसेगाव, ता. खटाव येथे आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीला लाखोंच्या संख्येने प्रेक्षक सहभागी झाले. या शर्यतीत सुमारे ४५६ गाड्यांनी सहभाग नोंदविला. खटाव तालुक्यात बऱ्याच वर्षानंतर भरलेल्या या आखाड्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या पुसेगावच्या बैलगाड्यांच्या शर्यतीच्या आखाड्याला विशेष महत्त्व आहे. गेल्या दोन-चार वर्षांपासून पुसेगावात बैलगाड्यांच्या शर्यती झाल्या नव्हत्या. त्यामुळे प्रेक्षकांनी आजच्या आखाड्याला प्रचंड गर्दी केली होती. यामुळे परिसरातील डोंगर प्रेक्षकांनी फुलून गेलेे होते. जागा मिळेल तेथे लोक बसले होते.
पुसेगाव बुध रस्त्याच्या पूर्वेला असलेल्या बाजार समितीच्या गोडाऊनच्या पुढील बाजूस दरा नावाच्या शिवारात झालेल्या या शर्यतीसाठी अनुक्रमे ७५ हजार रुपये, ५१ हजार, ४१ हजार, ३१ हजार ,२१ हजार, तर सहा व सातव्या क्रमांकासाठी प्रत्येकी ११ हजार रुपयांची बक्षिसे तसेच फेऱ्यात आलेल्या प्रथम व दुसऱ्या क्रमांकास अनुक्रमे ३०० व २०० रुपये, तर सेमी फायनलला आलेल्या दोन गाडीला अनुक्रमे ५०० व ३०० रुपये देण्यात आले.
शर्यतीत शासनाचे कोरोना विषयक सर्व नियम पाळून बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला. नावलौकिक असलेल्या पुसेगावच्या आड्याला साजेशे वर्तन सर्वच गाडीवान मालक, चालक व सवंगड्यांनी केल्याने लाखोंच्या संख्येने उपस्थित या शर्यती यशस्वी झाल्या. -विजय जाधव, माजी विश्वस्त श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट